शिवशाहीचा बसचालक निलंबित

गोंदियात भरधाव शिवशाही बसचे नियंत्रण सुटल्याने अपघातात 11 प्रवाशांच्या मृत्यूला जबाबदार धरत एसटी महामंडळाने बसचालक प्रणय रायपूरकर याला निलंबित केले आहे. न्यायालयाने बसचालकाला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बसचालक रायपूरकर याच्याकडून आतापर्यंत सहा वेळा अपघात घडले आहेत. मात्र, त्यात प्रवासी जखमी झाले नसल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नव्हती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गोंदिया जिह्यात सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डव्वा दरम्यान हा अपघात झाला होता. भरधाव वेगात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

शिवशाहीचा बसचालक प्रणय रायपूरकर हा 2011 मध्ये भंडारा आगारात वाहनचालक म्हणून रुजू झाला होता. त्याचा बॅच नंबर 318 असून गेल्या 12 वर्षांत त्याच्याकडून सहा वेळा अपघात झाला आहे.

कारवाई नाहीच

रायपूरकरकडून 20 डिसेंबर 2012 रोजी पहिला अपघात झाला. तो अपघात गंभीर होता, पण चौकशीनंतर त्याची निर्दोष सुटका केली गेली. शिवशाहीच्या अपघाताआधी झालेल्या सहा घटनांमध्ये सुदैवाने कुणाचा मृत्यू झाला नव्हता. पण यात दोषी आढळल्यानंतरही त्याच्यावर कोणती कठोर कारवाई करण्यात आली नव्हती.

z रायपूरकरने भरधाव वेगात शिवशाही चालवल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते का याचा तपास करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा वैद्यकीय अहवाल अजून यायचा आहे. मात्र, त्याने मद्यप्राशन केले नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली.