
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्यावतीने शिवसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने हिंदू नववर्ष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या सोहळ्याची संकल्पना माय मराठी अशी होती. गिरगांव नाका येथून स्वागतयात्रेला सुरुवात झाली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 22 फुटाची भव्य मूर्ती आकर्षण ठरली.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा चित्ररथ, मुंबईमध्ये मराठी माणूस आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, मुंबईत मराठी माणसाची होणारी गळचेपी, मराठी माणसा एक हो…संयुक्त महाराष्ट्राच्या लढयासाठी परत एकदा सज्ज हो, असे आवाहन चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात आले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरी पुतळा कधी बसवणार आणि अरबी समुद्रात शिवरायांचा पुतळा कधी उभारणार अशा विविध विषयावर आधारित चित्ररथ होते. संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे संविधान वाचवा, देश वाचवा असा संदेश देणारा चित्ररथ त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय देखावा सुद्धा सोहळ्यात होता.
गिरगाव येथे शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्यावतीने आयोजित शोभायात्रेमध्ये शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी ढोलपथकासह ताल धरला आणि ढोल वाजवून सर्वांचा उत्साह वाढवला.