जागे रहा, गुजरातच्या लबाडांचे लक्ष आता मुंबई, ठाणे महापालिकेवर! ठाण्यात शिवसेनेचा जोरदार मेळावा

विधानसभा निवडणुकीमध्ये मिंधे, भाजपने खोके आणि यंत्रणेचा वापर करून विजय मिळवला आहे हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता झालेला पराभव विसरा, गुजरातच्या लबाडांचे लक्ष आता ठाणे, मुंबई महापालिकेवर आहे. जागे रहा आणि पुन्हा झटून कामाला लागा, असे आवाहन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना केले.

ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सेना कार्यकर्त्याचा मेळावा खारकर आळी येथील एनकेटी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना विनायक राऊत यांनी ठाण्यातील गद्दारांचा समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरा आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन राऊत यांनी केले. चोरांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडवायचा असेल तर एकजुटीने काम करा, असे सांगतानाच महापालिका निवडणुका लागतील तेव्हा लागतील, पण  आतापासूनच कामाला लागा आणि ठाणे महानगरपालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच भगवा फडकवा, असे आवाहनही  राऊत यांनी शिवसैनिकांना केले. ईव्हीएममुळे त्यांचा विजय झाला आहे. त्यामूळे खचून जाऊ नका, ठाणे महापालिकेवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा भगवा फडकवायला तयार रहा, असे आवाहन यावेळी शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांनी केले. या निवडणुकीने आपल्याला खूप शिकवले आहे. प्रचार करताना आम्ही फिरत होतो तेव्हा ठाणेकर जोरदार स्वागत करत होते, अनेक पदाधिकाऱयांवर प्रचंड दबाव होता, पण कुणीही हटले नाही. यातून समजले की  ठाणे शिवसेनेचे होते आणि पुढेदेखील शिवसेनेचेच राहील, असा विश्वास ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केला.

यावेळी अर्थतज्ञ व राजकीय विश्लेषक विश्वास उटगी, प्रवक्ते अनिश गाढवे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, सहसचिव विश्वास निकम, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, संपर्कप्रमुख महेश नेने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधू मोहिते, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटिका रेखा खोपकर, उपजिल्हा संघटिका संपदा पांचाळ, महेश्वरी तरे, आकांक्षा राणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ही सत्तेला चिकटलेली गोचीड

पैसा आणि यंत्रणेचा वापर या लोकांनी कसा केला हे सगळय़ा जनतेने पाहिले आहे. विधानसभा निवडणुकीत यांनी सरळ मार्गाने विजय मिळवलेला नाही. त्यामुळे ही लोपं म्हणजे सत्तेला चिकटलेले गोचीड आहेत, असे फटकारेही राऊत यांनी लगावले. शिवसेना संपलेली नाही आणि संपवणाऱयांची अवलाददेखील जन्माला आली नाही. त्यामुळे घाबरू नका. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा, आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास विनायक राऊत त्यांनी यावेळी व्यक्त केला.