विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची वापराआधीच दैना, शिवसेना, युवासेनेकडून पोलखोल

एक मे 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मराठी भाषा भवनचे लोकार्पण करण्यात आले; परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत मराठी भाषा भवनाचा एकाही विद्यार्थ्याला उपयोग झालेला नाही.

भवनातील सर्व पुस्तके दोरीने बांधून ठेवली आहेत. वास्तूला गळती लागली आहे. निकृष्ट दर्जाचे काम आहे. वीज, पाणी, खुर्चा, टेबल नाही. उद्घाटनावर लाखो रुपये खर्च करूनही मराठी भाषा भवन वापरात येणार नव्हते, तर याचे लोकार्पण का केले? भवनाच्या चारही बाजूने पत्र्याचे कंपाउंड करून बंद ठेवले आहे. अनेक ठिकाणी भिंतींचे प्लॅस्टर उखडले आहे. पुस्तकांवर धुळीचे साम्राज्य आहे. विद्यार्थ्यांना बसायला व्यवस्था नाही. विद्यार्थी याचा लाभ घेतात, असे सांगितले जाते. परंतु, असे काहीही आढळत नाही. भाषा भवन बांधल्याचे श्रेय लाटण्याच्या प्रकाराची शिवसेना व युवासेनेच्या वतीने पोलखोल करण्यात आली.

याप्रसंगी पुणे विद्यापीठात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, शहर समन्वयक युवराज पारिख, संघटक अजय परदेशी उपस्थित होते.

संसदेत मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे फर्मान काढले जाते; मात्र याच महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी होताना दिसत आहे. मागील दहा वर्षांपासून मराठी भाषा भवनच्या इमारतीचे काम सुरू आहे. परंतु, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा विश्वास संपादन करण्यासाठी अर्धवट काम असताना लोकार्पण घाईघाईने केले गेले. कोनशिलेवर नाव यावे म्हणून उद्घाटनाचा घाट घातला गेला का, असा सवाल शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला. विद्यापीठाच्या साडेसहाशे कोटींच्या अंदाजपत्रकाचा अपव्यय होताना दिसत आहे. मुख्य इमारत ही हेरिटेज वास्तूमध्ये गणली जाते. तरीही इमारतीला बेकायदेशीररीत्या होल मारून विजेची व्यवस्था करण्यात आली. त्याचा खर्च अडीच कोटी रुपये दाखविला. विद्यापीठामध्ये फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, तशी केबल कुठेही टाकल्याचे किंवा राउटर बसविल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाने त्वरित या दुरवस्थेची दाखल घेण्याचा इशारा मोरे यांनी दिला.