शिवसैनिकाची 30 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता, विक्रोळी कोर्टाचा मोठा दिलासा

कथित चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिवसैनिकाची विक्रोळी येथील दंडाधिकारी न्यायालयाने तब्बल 30 वर्षांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीविरोधात कोणतेही सबळ पुरावे नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.

घाटकोपर येथे समाजसेवक म्हणून ओळख असलेले प्रकाश वाणी हे शिवसैनिक असून 1995 साली एका कथित प्रकरणात वाणी यांच्यासह मनजीतसिंह गिल आणि अशोक आढाव यांच्या विरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी विक्रोळी येथील दंडाधिकारी न्यायालयात अनेक वर्षांपासून सुरू होती. दंडाधिकारी अजय भटेवरा यांनी या खटल्यावर निकाल देताना प्रकाश वाणी यांची निर्दोष मुक्तता केली.