
म्हाडाने भुईभाडय़ात हजारपटीने वाढ केल्यामुळे जागतिक बँक प्रकल्पामार्फत उभारलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांमध्ये नाराजीचा सूर आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे भुईभाडे न आकारता आधी ज्या किमतीने रहिवाशांना जागा दिल्या आहेत, त्याचप्रमाणे भुईभाडे आकारावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेने बुधवारी म्हाडाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मनमानी पद्धतीने आकारली जाणारी भुईभाडे वाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या वतीने बुधवारी म्हाडाला देण्यात आला आहे.
जागतिक बँक प्रकल्पामार्फत म्हाडाने 1985-86 साली नागरिकांना गोराई, आपुर्ली, चारकोप, मालवणी, मुलुंड या ठिकाणी सवलतीत भूखंड दिले होते. नागरिकांनी सोसायटी बनवून त्यावर घरे बांधली. त्यावेळी अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी महिन्याला एक रुपया प्रति सदनिका भुईभाडे तसेच उच्च उत्पन्न गटासाठी किमतीच्या एक टक्के दराने भुईभाडे आकारून 90 वर्षांचा करार करण्यात आला, मात्र म्हाडाने अचानक तीस वर्षांनंतर भुईभाडे नूतनीकरणाचा घाट घातला आहे. नवीन दराने भुईभाडय़ाची मागणी करणारे पत्रदेखील संस्थांना प्राप्त झाली आहेत. विशेष म्हणजे, ही भाडेवाढ 26 ऑगस्ट 2021 पासून आकारण्यात आलेली असून थकबाकीसोबत प्रशासकीय शुल्क, जीएसटी व या सर्वांवर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी बुधवारी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेत भाडेवाढीचा फेरविचार करण्याची मागणी केली. त्यावर हा प्राधिकरणाचा ठराव असल्यामुळे रहिवाशांच्या मागण्यांचे निवेदन उपाध्यक्षांपुढे बैठकीत मांडू. त्यावर ते योग्य निर्णय घेईल, असे आश्वासन बोरीकर यांनी दिले. यावेळी विभागप्रमुख उदेश पाटेकर, अजित भंडारी, विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभा प्रमुख संजय भोसले, पांडुरंग देसाई ,संजय ढोलम, संतोष राणे, मिलिंद साटम, शशिकांत झोर उपस्थित होते.
n विधी विभागाचा सल्ला डावलून 30 वर्षांनंतर भुईभाडे कराराचे नूतनीकरण करण्याचा घाट म्हाडाने घातला असून हजार पटीने भुईभाडे वाढ केली आहे. या अन्यायकारक भुईभाडे वाढीचा प्राधिकरणाने फेरविचार करावा. वारंवार तक्रारी करूनही म्हाडा, शासन याकडे लक्ष देत नसेल तर चारकोप, गोराई, आपुर्ली, मालवणी, मुलुंड या परिसरातील गृहनिर्माण सभासदांचा उद्रेक होऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विनोद घोसाळकर यांनी दिला.
n चारकोप गायत्री गृहनिर्माण संस्थेला 2 मार्च 1996 ते 1 मार्च 2025 या कालावधीतील भुईभाडे भरण्यासाठी पत्र आले आहे. यात भुईभाडे सात लाख रुपये असून त्यावरील व्याज 16 लाख 85 हजार रुपये आहे, अशी 23 लाख 87 हजार रक्कम भरण्यासाठी या संस्थेला सांगितले आहे. एवढे पैसे भरण्याची सोसायटीची क्षमता नाही, याकडे घोसाळकर यांनी लक्ष वेधले.