महायुती सरकार म्हणजे एप्रिल फुल सरकार! आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. आज जगभरात एप्रिल फूल डे साजरा होतो, तर आपल्याकडे अच्छे दिन सरकार म्हणून साजरा होतो. निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने स्थापन झालेल्या महायुती सरकारचे नाव एप्रिल फूल सरकार ठेवले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या सरकारने दिलेली कोणतीही आश्वासने त्यांनी पाळली नाहीत. तसेच आता मुंबईकरांवर घनकचरा कर नावाने अदानी कर लादण्यात येत आहे, त्याचा सर्वांनी विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले. आम्ही याविरोधात आवाज उठवत असून तीव्र विरोध करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. लाडका भाऊ योजना बंद करण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांना कर्ज भरावे लागेल, असे सरकार सांगत आहे. एसंशि सरकारने मुंबई खड्ड्यात घातली आहे. तसेच मुंबईवर अदानी कर लादला जाणार असे आम्ही सांगत होतो, त्याची सुरुवात होत आहे. आता शहरातील घन कचऱ्यावरही कर लावण्यात येणार आहे. मुंबई पालिकेचा आणि मुंबईकरांचा विरोध असतानाही देवनार डपिंग ग्राऊंड अदानीला देण्यात आले होते. आता अदानी समूह ते स्वच्छ करून मागत आहे. त्यासाठी 2.5 ते 3 हजार कोटींचा बोजा मुंबई महापालिकेवर म्हणजे जनतेवर पडणार आहे. मुंबई महापालिका आपल्याकडे होती, तेव्हा असे कोणतेही छुपे कर आपण लावले नव्हते. तसेच आपण 500 चौरस फूटांच्या घरांवर मालमत्ता शुल्क माफ केले होते. मात्र, आता एप्रिल फूल सरकार जनतेवर घनकचरा शुल्क लादत आहे. असे अनेक छुपे कर तसेच अदानी कर मुंबईवर लादण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

हे कर लावत आहे, ते दर तीन वर्षांनी वाढत जातात. त्यात आणखी वाढ होणार आहे. ही परिस्थिती मुंबईकरांवर कोणी आणली, हा विचार करण्याची गरज आहे. आपल्याकडे महापालिका असताना 92 हजार कोटींच्या सरप्लसमध्ये होती. अनेक सुविधा आपण मोफत दिल्या होत्या. आता हे सरकार मुंबईकरांवर कर लावत आहेत. एसंशि सरकारने मुंबईची लूट केली आहे. जनतेचे पैसे चोरून लाडक्या कंत्राटदारांच्या खिशात टाकण्यात आले आहे. आता जनतेवर कर लादून मुंबईची लूट करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

घनकचरा कराबाबत 31 मेपर्यंत हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत. आपण या घनकचरा शुल्काला कडाडून विरोध केला पाहिजे. हा अदानी कर आहे. अदानीची सेवा करण्यासाठी, भाजपच्या मालकाची, एसंशिच्या मालकाची सेवा करण्यासाठी मुंबईवर हा कर लादला जात आहे. त्याची गरज नाही. मुंबईत अनेक गोष्टींसाठी कर लावला जातो. मात्र, तरीही मुंबईकरांवर हा कर का लावला जात आहे, याची विचारणा करण्याची गरज आहे. कोणतेही शुल्क न लावता हे काम होऊ शकते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

अदानीला सर्व कर माफ करायचे आणि मुंबईवर कर लादायचे, असे सरकारचे धोरण आहे. एसंशि सरकारने मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच निवडणुकीआधी रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन केले. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. ज्या रस्त्यांची कामे झाली आहेत. ती निकृष्ट दर्जाची आहे. या कामातून कंत्राटदारांचे खिसे भरण्यात आले आहेत. मुंबईत पाण्याची समस्याही गंभीर झाली आहे. महापालिकेकडे असलेली यंत्रणा वापरली तरी मुंबई स्वच्छ होणार आहे. त्यासाठी कोणत्याही कराची गरज नाही. मुंबईकरांवर सर्व बाजूने आर्थिक भार टाकण्यात येत आहे. मुंबईकरांनी हे कर भरायचे कसे, असा सवालही त्यांनी केला. मुंबईकरांकडून पैसे घेण्याआधी अदानी कडून पैसे घ्यावे, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.