कल्याणमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कल्याण रेल्वे, बस स्थानक परिसरात तर मुजोर रिक्षाचालकांच्या बेशिस्तीमुळे नागरिकांना चालायलाही जागा मिळत नाही. आरटीओच्या अर्थपूर्ण आशीर्वादामुळे रस्ते वाहतूक धोक्यात आली असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरवासीयांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिवसेनेने अधिकाऱ्यांना धारेवर धरताच रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला शिस्त लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
कल्याण शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात उपनेते विजय साळवी, जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ तारे, शहरप्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी उपशहरप्रमुख विजय काटकर, दत्ता खंडागळे, राजेंद्र दीक्षित, प्रदीप साळवी, दिनेश शेटे, अनिल गोवळकर, सुभाष पेणकर, अनिल डेरे, नीलेश भोर, सतीश वायचळ, हेमंत बागवे, सुधीर कंक, उदय गावडे, राजेंद्र लोंढे, जयवंत टापरे, सचिन सोष्टे, महिला आघाडीच्या राजलक्ष्मी अंगारके, सुनीता लेकावळे, मथुरा परदेशी आदी उपस्थित होते.
याकडे वेधले लक्ष
रिक्षांचे आणि त्यांच्या स्टॅण्डचे सुयोग्य नियोजन करण्याची मागणी यावेळी उपनेते विजय साळवी यांनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्याकडे केली. तसेच कल्याणशेजारील म्हारळ, मुरबाड आदी ठिकाणांहून कल्याणात होणारी सहाआसनी रिक्षांची बेकायदेशीर वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातात जाणारे बळी तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसच्या फिटनेसची तपासणी याकडेही विजय साळवी यांनी आशुतोष बारकुल यांचे लक्ष वेधले. यावर बारकुल यांनी तातडीने याबाबत उपायोजना करण्याची ग्वाही दिली.
केडीएमटी ढेपाळली
ढेपाळलेल्या केडीएमटी अधिकाऱ्यांची भेट घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन शहरातील रिंगरूटसह इतर महत्त्वाच्या मार्गावर बसेस चालवाव्यात, इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने व्यस्थापकांकडे केली. नागरिकांना सुविधा पुरवण्याऐवजी अधिकारीवर्ग एसी कार्यालयात बसून केवळ थंडगार हवा खात असल्याचा आरोपही विजय साळवी केला, तर महापालिकेच्या तिजोरीतून कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात असूनही शहरातील नागरिकांना पुरेशी बससेवा मिळत नाही. केडीएमटी सेवा केवळ नवीन बसेस विकत घेऊन त्यानंतर भंगारात विकण्यासाठीच कार्यरत असल्याचा गंभीर आरोपही साळवी यांनी यावेळी केला.