निर्मला सीतारमण वाढत्या महागाईत तेल ओतत आहेत; संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासादर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच युपीए सरकारच्या काळात महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही त्यांनी जबरदस्त टोला लगावला आहे. आता त्यांनी महागाईविरोधात सर्वसमान्य महिलांच्या आंदोलनाचे नेतृत्व करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती खाली येत असतील तर त्याचा फायदा देशातील सर्वसामान्य जनतेला मिळायला हवा. जगात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना देशात त्याचे दर वाढतात म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण वाढत्या महागाईत आणखी तेल ओतत आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडले आहे. कंगना राणावत, स्मृती इराणी यासारख्या भाजपच्या महिला नेत्यांनी आम्ही आंदोलनासाठी आमंत्रित करत आहेत, हा राजकारणाचा प्रश्न नसून गृहिणींच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. युपीए सरकारच्या काळात याच स्मृती इराणींनी महिलांचे नेतृत्व करत रस्त्यावर सिलिंडर टाकले होते आणि आंदोलन केले होते. आम्ही सिलिंडर पुरवू, त्यांनी फक्त रस्त्यावर बसायला यावे, असे टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने पेट्रोलृ डिझेलच्या किंमती 50 रुपयापर्यंत स्थिर असायल्या हव्या तर सिलिंडरचे दरही 400 रुपयांनी कमी व्हायला हवे. आम्हाला अर्थशात्र्य शिकवू नका, आम्हालाही अर्थशास्त्र समजते. देशात सर्वसामान्य माणसांची, गृहिणींची लूट सुरू आहे. निवडणुका आल्यावर लाडकी बहीण सारखी योजना आणायची, चार महिने राबवायाची आणि नंतर लाडक्या बहिणींनाही वाऱ्यावर सोडायचे, असे सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खाते कसे लुटले आणि अधिकाऱ्यांनीही कशी लूट केली, हे कॅगच्या अहवालावरून दिसून आले आहे. या सर्वांची चौकशी व्हायला हवी. याच कॅगच्या अहवलामुळे युपीए सरकार कोसळले होते. केजरीवाल यांच्यावर आरोप होत आहेत. आता या अहवालावरून या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी, असेही ते म्हणाले.