आनंद दिघे यांच्या पवित्र वास्तूत काहीजण दिघे यांच्या आसनासमोर पैसे उधळत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्याची चांगलीच सालटी काढली आहेत. अशा प्रकारे वर्तन करणारे आनंद दिघे यांचे वारसदार असूच शकत नाही. आज आनंद दिघे हयात असते तर अशाप्रकारे लुटीचा पैसा उधळत धिंगाणा करणाऱ्यांना त्यांनी फोडून काढले असते, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मिंध्यांवर टिकास्त्र सोडले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला.
आनंद दिघे यांच्याकडे भितींवर हंटर टांगलेला होता. आता त्यांनी हा धिंगाणा पाहिला असता तर त्यांनी तो हंटर काढून अशाप्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढले असते. काहीजण स्वतःला आनंद दिघे यांचे वारसदार म्हणवतात. मात्र, हा आनंद दिघे यांचा वारसा नाही, हे त्यांनी समजून घ्यावे. आनंद दिघे कधीही अशा लोकांचे समर्थन करत नव्हते. बारमध्ये उधळावेत त्याप्रमाणे ते दिघे यांच्या आसनासमोर पैसे उधळत आहेत. हा पैसा त्यांच्याकडे कोठून आला. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कंलकित करण्याचे काम हे मिंधे सरकार करत आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.
ते ज्यांना गुरू मानतात, त्या गुरुलाही त्यांनी सोडले नाही. त्या गुरुचीही त्यांनी अपकीर्ती केली. हे त्यांना गुरु मानतात. मात्र, त्यांनी यांना कधी शिष्य मानले होते काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला. हे जर त्यांचे शिष्य असते तर त्यांच्या चेल्यांनी गुरुच्या आसनासमोर अशाप्रकारे पैसे उधळले नसते, असेही संजय राऊत म्हणाले. अशाप्रकारे पैशांचा धिंगाणा राज्यभर सुरू आहे. असा धिंगाणा फक्त लुटलेल्या पैशातूनच करता येतो.कष्टाच्या पैशातून पवित्र, धार्मिक, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे धिंगाणा केला जात नाही, असेही ते म्हणाले.
अशाप्रकारे पैसे उडवणारे कोण आहेत, याची चौकशी करण्यात यावी. त्यांच्याकडे उधळण्याइतका पैसा आला कोठून, याची चौकशी होण्याची गरज आहे. आनंद दिघे यांच्या पवित्र वास्तूत धिंगाणा सुरू आहे. स्वतःला आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवणारे मुख्यमंत्री किंवा त्यांच्या चेल्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, हीच त्याची संस्कृती आहे काय, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे आज दिघे साहेब असते तर त्यांनी असा धिंगाणा करणाऱ्यांना फोडून काढले असते, अशा शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. आता त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा दर्शनाला येत आहेत. अमिश शहा आले, तेव्हा लालबागच्या राजाचे वैभव, ही राजा ते गुजरातला नेतील, अशी शंका आमच्या मनात आली. मुंबईतील सर्व उद्योगधंदे, सर्व संपन्नता, सर्व वैभन गुजरातला नेण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे आमच्या मनात अशी शंका आली, असा टोलाही त्यांनी हाणाला. महायुतीविरोधात जनतेत चीड आणि संताप आहे. त्यामुळे या सरकारला राज्यातून पळून जायची वेळ येणार आहे. जनतेच्या भावना तीव्र आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच हे सरकार पळून गेले, तर आश्चर्य वाटायला नको. जनताच आता या सरकारला पळवून लावणार आहे,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.