शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील बदलणाऱ्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले. महायुतीचे प्रेम हे शेम-शेम आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अनेक नेते भाजपच्या दबावासमोर झुकले. मात्र आम्ही शरणागती पत्करणार नाही, आम्ही मराष्ट्राच्या शत्रूशी लढतच राहणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मोदी, शहा महाराष्ट्राचे शत्रू आहे, त्यांना या मातीत पाय ठेवायला देऊ नका, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. मात्र, आता त्यांना काय चमत्कार झाला, त्यांना कोणता साक्षात्कार झाली की ते पलटी मारून भाजपला पाठिंबा देत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.महाराष्ट्राचे शत्रू म्हणणाऱ्यांनाच ते पाठिंबा देत आहेत, आता ते जनतेला काय सांगणार आहेत, असा सवालही त्यांनी केला. अशी कोणती फाईल त्यांना दाखवली की त्यांनी यूटर्न घेतला, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांनी निर्णय घेतला. तरी एक चांगले आहे की, त्यांनी खुलेपणाने पाठिंबा जाहीर केला. अनेकदा उमेदवार उभे करायचे आणि मतविभआगणी करायची, असे राजकारण त्यांनी केले नाही. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, महाराष्ट्राची लूट सुरू आहे. महाराष्ट्रात जे खोक्याचे राजकारण सुरू आहे, त्याचे खरे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत.राज्यातून उद्योग पळवले जात आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष, महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर जनतेच्या मानात प्रश्न निर्माण होणारच आहेत. त्याची उत्तरे त्यांनीच देण्याची गरज आहे. असे नेमके काय घडले की महाराष्ट्राच्या शत्रूंना तुम्हाला पाठिंबा द्यावा लागला, हे त्यांना जनतेला सांगावेच लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.
त्यांचा पक्ष अचानक नमोनिर्माण पक्ष का झाला, त्यांच्या पक्षाला नमोनिर्माण पक्ष होण्याची काय गरज पडली, हे त्यांना सांगावे लागेल. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांना उत्तरे द्यावी लागतील. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी लढत आहोत. समोर नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो, आम्ही शणागती पत्करणार नाही, असेही त्यांनी ठणाकावले. आम्ही स्वार्थासाठी कधीही भाजपसोबत राहिलो नाही. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालाकृष्ण आडवानी, प्रमोद महाजन या नेत्यांनी त्या काळात हिंदू मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी ती युती केली होती. ती 25 वर्षे टिकली. मात्र, भाजपने स्वतःचे खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि स्वतंत्रपणे आमच्या भूमिका घेतल्या. आजही महाराष्ट्राबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रावर घाव घालण्याचे, महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला ठेच पोहचवण्याचा प्रयत्न होत असेल तर शिवसेना महाराष्ट्राच्या शत्रूविरोधात उभी ठाकली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्वांनी एकजूटीने महाराष्ट्राच्या शत्रूंचा विरोध केला, तसेच आम्ही राज्याच्या शत्रूंचा विरोध करत आहोत. राजकीय व्याभिचार म्हणजे काय हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारातून समजून घेतले पाहिजे. आम्ही त्यांचे विचार मानणारे आहोत. राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्याभिचारी यांनी भाजपने त्यांच्या पक्षात घेतले आहे. अशा व्याभिचारींच्या व्यासपीठावर जात नमोनिर्माणसाठी ते पाठिंबा देत असतील, तर त्याबाबत त्यांनीच जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेते भाजपसोबत गेले, ते का गेले हे सर्वांना माहिती आहे. कोणत्या तपास यंत्रणेच्या दबावाखाली गेले, त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या, त्यामुळे भाजपसमोर शरणागती पत्करून ते गेले. भाजपचा राजकीय व्याभिचार जगजाहीर आहे. ठाकरे हे नाव असे आहे, ज्यांना कणी झुकवू आणि नमवू शकत नाही, हा इतिहास आहे. उद्धव ठाकरे यांनाही झुकवण्याचा प्रयत्न झाला, ते झुकले नाहीत. बाळासाहेबांचे शिलेदार असलेल्या आम्हालाही झुकवण्याचा, तोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आम्ही तुटलो नाही, झुकलो नाही. आम्ही आजही लढत आहोत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांची गरज आहे. हा महाराष्ट्रच्या हिताचा निर्णय नाही. महाराष्ट्र हितासाठी मोदी आणि शहा यांच्याविरोधात ठाम उभे राहण्याची गरज आहे.
महायुतीचे राजकारण हे प्रेम नसून शेम, शेम, शेम आहे, असा टोला लगावत त्यांनी भाजपचा राजकी व्याभिचार उघड केला. महाविकास आघाडीचा काल जागावाटपाचा अंतिम निर्णय झाला आहे. सांगलीत महाविकास आघाडी एकत्र आहे. विशाल पाटील यांनी 2019 मध्ये काँग्रेस सोडली होती. त्याचे परिणाम त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते अशी चूक पुन्हा करणार नाही. तसेच विश्वजीत कदम यांच्याकडे सर्वांना समजवण्याची जबाबदारी दिली आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. नवी दिल्लीत सुरू असलेले राजकारण जग बघत आहे. बहुमत असलेल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी तुरुंगात टाकले आहे. तसेच नायब राज्यपालांद्वारे दिल्लीत राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव सुरू आहे. अशा प्रकारचे राजकारण योग्य नाही, हे देशाला घातक आहे, असेही संजय राऊत यांनी दिल्लीतील परिस्थितीबाबत सांगितले.