अमित शहा अपयशी गृहमंत्री, भाजपने निषेधाची नौटंकी थांबवावी, त्यांचा राजीनामा घ्यावा; संजय राऊत यांची मागणी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जबाबदार आहे. भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण यामुळेच हा हल्ला झाला आहे. नेहमी राजकारणात गुंतलेला आणि सरकारे पाडण्याची कटकारस्थानी गृहमंत्री अमित शहा यांचे देशाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. राजकारणातून त्यांना सुरक्षेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. या घटनेला जबाबदार असलेल्या शहा यांनी राजीनामा द्यावा, या पदावर एक मिनिटही राहण्यास ते योग्य नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचे हे फल असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यंटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. मोदी सरकारने जम्मू कश्मीरमधून कलम 370 हडटवले. त्यानंतर जम्मू कश्मीर केंद्रशासित केले. केंद्र सरकारचे नियंत्रण राहवे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या दुर्घटनेची जबाबादारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची जबाबदारी असताना ही दुर्घटना कशी घडली, असा सवालही त्यांनी केला.

जम्मू कश्मीरमधील हा पर्यटकांचा हंगाम आहे. या काळात मोठ्या संख्येने पर्यटक जम्मू कश्मीरमध्ये जातात. घटना घडली त्यावेळी सुमारे 2 ते 3 हजार पर्यटक त्याठिकाणी असतानाही एकही पोलीस किंवा सरक्षारक्षक तेथे नव्हता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगर विमानतळावर उतरले तेव्हा त्यांच्यासोबत 75 वाहनांचा ताफा होता. तसेच 500 पेक्षा गनमेन, पोलीस पथक आणि बॉम्बशोधक,नाशक पथक होते. एका व्यक्तीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था होती. मात्र, सामान्य माणसांसासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे ते म्हणाले.

सामान्य माणसांसाठी सुरक्षाव्यवस्था नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे लष्करात सुमारे दोन लाख पदे रिक्त आहेत. संरक्षण बजेटमध्ये कपात करण्यासाठी ही रिक्त पदे भरण्यात येत नाही. तसेच लाडकी बहीणसारख्या योजनांसाठी हा पैसा वळवण्यात येतो आणि देशांचा सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत आहे. तसेच जम्मू कश्मीरमधील दहशतवाद संपत असल्याचा दावा मोदी, शहा करत होते. मात्र, प्रत्यक्षात जम्मू कश्मीरमधील दहशतवाद वाढत आहे. संसदेत हे रेटून खोटे बोलत आहेत. घडणाऱ्या घटना दाबून टाकण्यात येत आहे. त्यामुळे अनेक घटनांची माहितीच मिळत नाही. असे त्यांनी सांगितले.

पहलगाममध्ये घडलेल्या हल्ल्याच्या घटनेला केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत. देशात पश्चिम बंगालपासून जम्मू कश्मीरपर्यंत द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे, त्याचेच हे परिणाम आहेत. हे फक्त मोठ्यामोठ्या बाता मारतात. निवडणुका आल्यावर अनेक फसवी आश्वासने देतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे सर्व कामच पोकळ आहे. आता 56 इंची छाती कुठे गेली? पर्यटकांच्या कुटुंबियांच्या आक्रोशाला मोदी आणि शहाच जबाबदार आहे. सरकार बनवण्यात आणि बिगर भाजपची सरकारे पाडण्यात त्यांच्या दिवस जातो. विरोधी पक्षाच्या कोणत्या नेत्यांनी तुरुंगाच टाकायचे, कोणाला कशात अडकवायचे, कोणत्या खासदार, आमदार यांना विकत घ्यायचे, असेच विचार नेहमी त्यांच्या मनात असतात. त्यांच्या डोक्यात असे विकृत विचार असल्यावर जनतेचे रक्षण ते कसे करणार, असा सवालही त्यांनी केला. अमित शहा हे अपयशी गृहमंत्री आहेत. संपूर्ण देश त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. अपशकुनी आणि अपयशी गृहमंत्री असल्याने त्यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही. ते दिवसभर कटकारस्थाने करण्यात गुंतलेले असतात. त्यांचा दिवस सूडाच्या राजकारणात जातो. ते इतर पक्ष फोडण्यात गुंतले आहेत आणि अशा घटनांनी देश तुटत आहे. देशावर दहशतवादी हल्ले होत असताना हे राजकारणात व्यस्त आहेत. अशी व्यक्ती गृहमंत्री पदावर असणे देशासाठी धोकादायक आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

हल्ल्यानंतर ते पहलगामला गेले, हे काय त्यांनी जनतेवर उपकार केले आहेत काय, 27 लोकांच्या हत्येचे ते दोषी आहेत. या हल्ल्यात मुस्लिमांचाही मृत्यू झाला आहे. जर दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या असतील तर त्याला भाजपचे द्वेषाचे राजकारणच जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. देशात सध्या ज्याप्रमाणे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण सुरू आहे. ते बुमरँग होण्याचा धोका आहे. भाजपचे हे द्वेषाचे राजकारणही या घटनेसाठी कारणीभूत ठरले आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. भाजपने या हल्ल्याचा निषेध करण्याची नौटंकी बंद करावी. हल्ल्याला जबाबदार असलेल्या मोदी आणि शहांचा भाजपने निषध करावा. करारा जबाब म्हणजे नेमके काय आहे. पुन्हा एखादा खोटा सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल का, त्यांच्या फक्त मोठ्या गोष्टी असतात. त्यांची गँग आणि गुंडागर्दी गल्लीबोळात चालते. अशाप्रकारे देश चालवता येत नाही. ते दहशतवाद संपवत नसून देशाच्या लोकशाहीची हत्या करत आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

जशास तसे उत्तर देणार म्हणजे मिंधे नेमके काय करणार, ते त्यांच्या गटासह सीमेवर जाणार काय, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी शहा यांचा राजीनामा घ्यावा, असेही संजय राऊत यांनी सांगितले. जम्मू कश्मीर पर्यटकांसाठी स्वर्ग बनवू असे मोदी, शहा सांगत होते. आता त्यांच्यामुळे 27 जणांचा बळी गेला. भाजपवाले जनतेला मूर्ख बनवत आहेत. मृत्यू झालेले पर्यटक नंदनवनात मृत्यू पावले आहेत, ते स्वर्गात गेले, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात येईल, असेही संजय राऊत म्हणाले.