महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आणि विष पेरण्याचे काम भाजपने केले; संजय राऊत यांचा प्रहार

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या कटुता आणि द्वेष दिसून येतो. महाराष्ट्राचे राजकारण याआधी असे कधीच नव्हते. राज्याच्या राजकारणात कटुता आणि विष पेरण्याचे काम भाजपने केले, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर प्रहार केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आणि विष पेरण्याचे काम भाजपने केले आहे. याआधी महाराष्ट्रातील राजकारण असे कधीच नव्हते. ओठांवर एक आणि पोटात वेगळेच असे मराठी माणसांच्या राज्यात महाराष्ट्रात कधीच नव्हते.यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासूनचे राजकारण आम्ही पाहिले आहे. त्यांच्यासारख्या टोलजंग व्यक्तीला भेटण्याची संधी आम्हाला लाभली.

सध्या शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांवरही संजय राऊत यांनी मत व्यक्त केले. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यासाठी त्यांच्याकडे अनेक संस्था आहेत. राजकीयदृष्ट्या ते एकत्र आले किंवा नाही, याची माहिती नाही. मात्र, आजही शरद पवार त्यांच्या पक्षाच्या संघटनासाठी आणि बळकटीकरणासाठी काम करत आहेत.सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे सर्व पक्षांचा बांधणीसाठी जिवाचे रान करत आहेत. ते एकत्र आले असतील तर ते त्यांच्या संस्थेच्या कामासाठी आले असतील, असेही ते म्हणाले. मात्र, कोणी एकत्र आले किंवा दुरावा निर्माण झाला तर त्याचा संबंध थेट राजकारणाशी जोडला जातो. मात्र, राजकारणाव्यतिरिक्तही नाती, जिव्हाळा असतो. तो जपला तर त्यात काय गैर आहे. राज्याचे राजकारण भाजपने गढूळ केले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.