शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषेदत घेत महाविकास आघाडीत सर्व सुरळीत सुरू आहे. जागावाटपाचा प्रश्न आजच मार्गी लावला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीत सर्व सुरळीत असून कोणीही चिंता करू नये, असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला. जागावाटापाचा प्रश्न आज मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी काल आमची चर्चा झाली. या बैठकीनंतर शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षातील जागावाटपाबाबतचा तिढा सुटलेला आहे. आता एखादी जागा सोडल्यास आमच्यात कोणतेही मतभेद नाही. ते मतभेदही आज संध्याकाळपर्यंत दूर करण्यात येतील. दिल्लीत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आता मुंबईत आले आहेत. ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मातोश्री येथे ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करून मतभेद दूर केले जातील. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून सर्व सुरळीत सुरू असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त मते मिळालेल्या मतदारसंघात अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून वगळ्यात येत आहे. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करत भाजप हे पाप करत आहे. अशा प्रकारे यादीतून नावे वगळण्यात येत असल्याचे गंभीर आहे, असेही ते म्हणाले. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज जागावाटपाबाबतचा तिढा सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.