मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेनं दणदणीत विजय मिळत 10 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील तरुण, सुशिक्षित, पदवीधर हे शिवसेना, युवासेना यांच्या पाठीशी आहे, हे दिसून आले आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच सुशिक्षित मतदार विकले जात नाहीत आणि हे मतदान बॅलेट पेपरवर होत असल्याने भाजप आणि मिंधेना काहीही गडबड करता आली नाही आणि त्यांचा सणकून पराभव झाला. मते विकत घेता येतात, या भ्रमात असणारे तोंडावर आपटले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजप आणि मिंधे गटावर केला.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका रखडवण्याचा आणि टाळण्याचा भाजप आणि मिंधे गटाने कसोशीने प्रयत्न केला. मतदारयादीच रद्द करणे, यासारखे अनेक उपद्व्याप त्यांनी केले. दोन वर्षाच अनेकदा निवडणुका घेण्याचे टाळण्यात आले. अखेर उच्च न्यायालयाने त्यांना दणका दिला. त्यामुळे सिनेटच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत सर्वच्यासर्व 10 जागा शिवसेनेनं जिंकल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील तरुण, सुशिक्षित वर्ग शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेसोबत असल्याचे दिसून आले आहे.
याआधी पदवीधर मतदारसंघातही शिवसेनेचा विजय झाला होता. आता सिनेटच्या निवडणुकीतही शिवसेनेनं विजय मिळवला आहे. या मतदारसंघात पदवीधर लाडक्या बहीणीही मोठ्या प्रमाणात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 10 पैकी आमच्या 9 उमेदवारांनी कोटा तोडून मतदान मिळवले आहे. आमच्या शेवटच्या उमेदवाराची 865 मते मिळवली आहे. तर एबीव्हीपीच्या सर्व उमेदवारांची मिळून 706 मतं आहेत. मुंबई विद्यापीठावर अभिमानाने भगवा फडकता आला आहे.
भाजप आणि मिंधे यांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना ही निवडणूक टाळता आलेली नाही. तसेच झालेली निवडणूक त्यांना जिंकता आली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे यातील मतदार सुशिक्षित आणि पदवीधर आहे. हे मतदार विकले जात नाही. तसेच ही निवडणूक ईव्हीएमवर न होता, बॅलेट पेपरवर होते. त्यामुळे त्यांना काहीही गडबड करता आली नाही. मुंबईतील तरुणांनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मतदान केले. यातून मुंबईतील तरुणांचा, सुशिक्षतांचा कल दिसून आला आहे.ही सुरुवात असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
अदानी यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही तर त्यांचे कंत्राट रद्द करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अदानीचे कंत्राट रद्द करण्याचे अधिकार फडणवीस यांना आहेत का, अदानी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा कंत्राटे देतात. अदानी हे मोदी, शहा यांचे लाडके उद्योगपती आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही.
धारावी विधानसभेची जागा शिवसेनेने लढवावी, अशी मागणी होत आहे. धारावी कृती समितीचे नेते यासाठी भेटी घेत आहेत. धारावी बचाव आंदोलनाला शिवसेनेने बळ दिले आहे. त्यांची भूमिका आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहोत. तसेच काँग्रेस नेत्यांशीही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीत कोणताही पक्ष स्वतःचा आकडा घेऊन बसलेले नाहीत. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयमी भूमिका घेत आहेत. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीची वज्रमूठ बळकट आहे. त्यामुळे भाजपला आम्ही लोकसभा निवडणुकीत दणका दिला आहे. अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावे, ते आमच्यासोबत आले असते तर भाजपला राज्यातून हद्दपार केले असते. संविधानाला अजूनही धोका आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावे, असेही संजय राऊत म्हणाले.