राज्याचे गृहमंत्री स्वतःची सुरक्षा स्वतःच वाढवून घेत आहेत, त्यांना नेमका कसला धोका आहे, राज्याच्या गहमंत्र्यांलाच फोर्स वनच्या पूर्ण पथकाची गरज लागत असेल तर आम्हाला चिंता वाटते. फडणवीस यांना नेमका कोणापासून धोका आहे? इस्रायल, सिरीया, युक्रेन नेमका कोणता देश फडणवीस यांच्यावर हल्ला करणार आहे? याची माहिती राज्याला हवी आहे. येत्या काही दिवसात महायुतीत मुख्य़मंत्रीपदासाठी लढाई वाढणार असल्याने फडणवीस यांना मुख्यमंत्र्यापासून धोका आहे काय? असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी जबरदस्त भीमटोला लगावला.
नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर बेकायदा मुख्यमंत्री लादले आहेत. मोदी शहांचा सुभेदार मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करत आहे. महाराष्ट्र ओरबाडला जडात आहे. महाराषअट्राची लूट होत असून सर्व माल दिल्ली आणि उद्योग गुजरातला जात असल्याने मोदी, शहा खुश आहेत, असा टोला संजय राऊत यांनी मिंधे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लगावला.
राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःची सुरक्षा स्वतःच वाढवून घेतली. फोर्स वनचे अत्याधुनिक, अद्ययावत शस्त्रे असलेले कमांडो त्यांच्या घराला गराडा घालून बसले आहेत. राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नाही, तो स्वतःची सुरक्षा हवी तशी वाढवून घेतो. सागर बंगल्यावर, नागपूरच्या घराबाहेर, त्यांच्या कुटुंबासोबत फोर्स वनचे कमांडो आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला चिंता वाटत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्त्वात आहे काय, राज्यात काही अघित घडू शकते काय, अशई शंका येत आहे.
फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना नेमका कोणापासून धोका आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे काय, असा टोलाही त्यांनी लगावला. येत्या काही दिवसात मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. मात्र, फडणवीस गृहमंत्री असताना त्यांना स्वतःची सुरक्षा वाढवण्याची गरज का भासली, दहशतवाद्यांशी लढण्यासाठी फोर्स वन तैनात असते. त्यांची सुरक्षा घेण्याची फडणवीस यांनी गरज का भासली, असा सवालही संजय राऊत यांनी केला.
ज्यांना फडणवीसांनी आश्वासने दिली होती, ती पूर्ण झाली नाही, त्यामुळे त्यांच्यापासून त्यांना धोका आहे. फडणवीस यांच्यावर इस्रायल की युक्रेन हल्ला करणार आहे, म्हणून त्यांना कमांडोंची सुरक्षा देण्याची गरज भासली, असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या पोलीस महायंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्याला सांगण्याची गरज आहे की, देवाभाऊंना अतिरिक्त सुरक्षा का द्यावी लागली, निवडणुकीच्या अनेक विरोधकांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. अद्वय हिरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. अनेकांना धमक्या येत आहे, हल्ले होत आहे. मागणी करूनही त्यांना एकही पोलीस वाढवून दिला जात नाही. आमच्यासारख्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली, आमची तक्रार नाही. पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांना एवढी कोणाची भीती वाटत आहे, असा सवालही त्यांनी केला.
अनेक प्रकल्प गुजरातले पळवून नेले. महाराष्ट्राचे हक्काचे ओरबाडायचे आणि इथे येत महाराष्ट्राच्या तोंडावर काहीतरी फेकून जायचे, असे त्यांचे सुरू आहे. महाराष्ट्र भिकारी आहे काय, महाराष्ट्र त्यांच्या भिकेवर जगत नाही. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याबाबातही आक्षेपार्ह विधाने केली आहेत. अरविंद सावंत जबाबदार नेते आहेत. भाजपच्या उमेदवार मुंबईच्या नाहीत. त्या बाहेरून आयात केलेल्या आहेत. त्यासंदर्भात अरविंद सावंत यांनी बाहेरून आलेला व्यक्ती, आयात केलेल्या उमेदवार असे म्हणाले, त्यात अयोग्य काय आहे, सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
गद्दार, बेइमान नेत्यांनी आम्हाला हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दाखल देऊ नये, बाळासाहेब काय होते, ते आम्हाला चांगले माहिती आहे. बाळासाहेबांचा शिक्का, नाणे त्यांच्याकडे चालणार नाही. त्यांनी ते चालवू नये. आज बाळासाहेब असते तर त्यांची दाढी भादरून त्यांची धिंड काढली असती, असा हल्लाबोलही त्यांनी केला. महायुतीने या काळात बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांनी विधानपरिषदेची, आमदारकीची आश्वासने दिली आहेत. अशी आश्वासने दिलेल्यांची संख्या 100 च्या वर आहे. त्यांच्यासाठी वेगळी विधानसभा राज्यात बनवावी लागेल, अशा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.