शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राज्यसभेत देशातील लोकशाही आणि महाकुंभमध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत भाष्य केले. यावेळी देशातील लोकशाही गंभीर स्थितीत आहे. सरकार निवडणुकीच्या चक्रातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच महाकुंभमध्ये झालेली घटना ही मनुष्यवधाची असून या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असा हल्ला त्यांनी सरकारवर चढवला.
भारत हा महान देश आहे. महान देशाचे राष्ट्रपती आपले विचार एखाद्या मंचावर मांडतात, तेव्हा त्या विचारांचा आदर केला पाहिजे. त्यावर चिंतन केले पाहिजे. आपल्या सध्या आपल्या देशात अशी स्थिती दिसत नाही. आपल्या देशातील लोकशाही फ्रॅक्टर झाली आहे, आयसीयूमध्ये आहे, शेवटच्या घटका मोजत आहे, अशा देशात राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांचे विचार देशातील जनता गंभीरतेने घेत नाही. हे दुर्दैवी आहे, असे संजय राऊत म्हणाले.
देशातील लोकशाहीच्या महत्त्वाच्या संस्था संसद, न्यायव्यवस्था यावरील जनतेचा विश्वास कमी होत आहे. फक्त निवडणुका घेणे, त्या जिंकणे आणि त्या जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, ही लोकशाही निश्चितच नाही. देशात सध्या सरकार निवडणूक कामात गुतंले आहे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यासह अनेक केंद्रीय मंत्री निवडणूक प्रचारात गुतंलेले दिसतात. जोपर्यंत पंतप्रधानांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंतचे सर्वजण निवडणुकीच्या या चक्रातून बाहेर येत नाही. तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक प्रचारात लक्ष घालण्याऐवजी सरकारने सरकारचेच काम करणे गरजेचे आहे. निवडणुकीत अनेक खोटी, फसवी आश्वासने देण्यात येतात. अनेक मोठ्यामोठ्या बाता मारण्यात येतात. सत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यावरून सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती दिसून येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाकुंभमधील दुर्घटनेबाबत अनेक सदस्यांनी मत व्यक्त केले आहे. हा आमच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. महाकुंभसारख्या धर्माची जोडलेल्या गोष्टी योग्य पद्धतीने नियोजनपूर्वक व्हाव्यात, अशी आमची इच्छा आहे. उत्तर प्रदेश सरकारने डिजीटल महाकुंभची घोषणा केली होती. त्यामुळे कोणताही त्रास, अडचण होणार नाही, असे सांगण्यात आले होते. देशातील जनतेला आमंत्रणेही देण्यात आली होती. 20 कोटी, 25 कोटी जनता येणार, असे सांगण्यात येत होते. मात्र, तेथील सर्व व्यवस्था कोलमडली होती. कुंभमेळा हा फक्त राजकीय इव्हेंट करण्यात आला. राजकीय मार्केटिंग करण्यात आले. तसेच चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडल्यानंतर चेंगराचेंगरी झालीच नाही. ती अफवा आहे, असे खोटे सांगण्यात आले. जनतेचा मृत्यू होत असेल आणि सरकार सांगत असेल की कोणतीही दुर्घटना घडलीच नाही, तर हे खूप गंभीर आहे. शंकराचार्यानीही याबाबत रोष व्यक्त केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झाले, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, हे आकडे खरे आहेत काय? सरकारने सत्य लपवू नये, सत्या देशासमोर मांडावे, एकाही जणाचा मृत्यू झाला असेल तर तो मनुष्यवध आहे. त्यासाठी सरकार जबाबदार आहे. अशी दुर्घटना दुसऱ्या कोणत्याही देशात घडली असती तर तेथील पंतप्रधानांचा राजीनामा घेण्यात आला असता. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला असता. मात्र, जी दुर्घटना घडली आहे, देशाने सर्व घटना पाहिली आहे. या दुर्घटनेत सुमारे 2 हजार जण बेपत्ता अनेक मृतदेह कचऱ्यात पडल्याचेही सांगण्यात येत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितल्यानंतर सभापतींना तुंची वेळ संपली आहे, असे सांगत त्यांनी बोलण्यापासून रोखले. तसेच तुम्ही जी आकडेवारी सांगत आहात. त्यांची पुष्टी करा, असेही सभापतींनी सांगितले.