शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राज्यसभेत देशातील लोकशाही आणि महाकुंभमध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत भाष्य केले. यावेळी देशातील लोकशाही गंभीर स्थितीत आहे. सरकार निवडणुकीच्या चक्रातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
भारत हा महान देश आहे. महान देशाचे राष्ट्रपती आपले विचार एखाद्या मंचावर मांडतात, तेव्हा त्या विचारांचा आदर केला पाहिजे. त्यावर चिंतन केले पाहिजे. आपल्या सध्या आपल्या देशात अशी स्थिती दिसत नाही. आपल्या देशातील लोकशाही फ्रॅक्टर झाली आहे, आयसीयूमध्ये आहे, शेवटच्या घटका मोजत आहे, अशा देशात राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांचे विचार देशातील जनता गंभीरतेने घेत नाही. हे दुर्दैवी आहे, असे संजय राऊत म्हणाले.
देशातील लोकशाहीच्या महत्त्वाच्या संस्था संसद, न्यायव्यवस्था यावरील जनतेचा विश्वास कमी होत आहे. फक्त निवडणुका घेणे, त्या जिंकणे आणि त्या जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, ही लोकशाही निश्चितच नाही. देशात सध्या सरकार निवडणूक कामात गुतंले आहे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यासह अनेक केंद्रीय मंत्री निवडणूक प्रचारात गुतंलेले दिसतात. जोपर्यंत पंतप्रधानांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंतचे सर्वजण निवडणुकीच्या या चक्रातून बाहेर येत नाही. तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक प्रचारात लक्ष घालण्याऐवजी सरकारने सरकारचेच काम करणे गरजेचे आहे. निवडणुकीत अनेक खोटी, फसवी आश्वासने देण्यात येतात. अनेक मोठ्यामोठ्या बाता मारण्यात येतात. सत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यावरून सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती दिसून येते, असे त्यांनी स्पष्ट केले.