मराठीला डावलणाऱ्या केईएम रुग्णालयाला शिवसेनेचा दणका, इंग्रजी बोर्डाला काळे फासले

मुंबई महानगरपालिकेचे केईएम रुग्णालय शतकपूर्ती सोहळा साजरा करीत असताना गेटबाहेर इंग्रजीमध्ये स्वागताचा बोर्ड लावण्यात आला आहे. केईएम प्रशासनाकडून मराठीला डावलल्याची गंभीर दखल घेत शिवसेनेने गेटवरील इंग्रजी बोर्डाला आज काळे फासले.

शतक महोत्सवी वर्ष कार्यक्रमास परदेशी पाहुणे येणार असल्याचे सांगत गेटवरील बोर्ड इंग्रजीत लिहिला आहे. मात्र कार्यक्रम संपून दोन महिने झाले तरी प्रशासनाने या ठिकाणचा इंग्रजी बोर्ड काढलेला नाही. त्यामुळे शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय प्रशासनाला अर्ज देण्यात आला. याला एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळेच या ठिकाणच्या इंग्रजी बोर्डला शिवसेनेने काळे फासल्याचे माजी नगरसेवक आणि ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले.

तातडीने बदल कराअन्यथा तीव्र आंदोलन

या ठिकाणचा इंग्रजी बोर्ड काढून मराठी भाषेत फलक तातडीने लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची पूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची राहील, असा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आल्याचे अनिल कोकीळ यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक दत्ता पोंगडे, सिंधू मसुरकर, सचिन पडवळ, शाखाप्रमुख मीनार नाटळकर, किरण तावडे, जयसिंग भोसले, विजय इंदुलकर, बैजू हिंदोळे, रूपाली चांदे यांच्यासह उपशाखाप्रमुख, शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकही सहभागी झाले होते.