शिवसेना जनतेच्या हृदयातच; मिंध्यांवर ईव्हीएमची कृपा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आणि ठाकरे कुटुंबाची जागा कायम जनतेच्या हृदयात आहे. विधानसभा निवडणुकीत मिंधे गटाला मिळालेल्या जागा या ईव्हीएमची कृपा आहे अशी टीका भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांनी केली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होईल, असा विश्वासदेखील साईनाथ तारे यांनी व्यक्त केला.

भिवंडी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय सभागृहात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनेते तथा जिल्हा ग्रामीणप्रमुख विश्वास थळे, उपनेत्या ज्योती ठाकरे, सहसंपर्कप्रमुख सोन्या पाटील, तालुकाप्रमुख कुंदन पाटील, ग्रामीण विधानसभा प्रमुख महादेव घाटाळ, उपजिल्हाप्रमुख कृष्णा वाकडे, इरफान भुरे, तुळशीराम पाटील, जिल्हा सचिव जय भगत, महिला उपजिल्हा संघटक कविता भगत, तालुका महिला संघटक फशिताई पाटील, ग्रामीण विधानसभा संघटक हनुमान पाटील, तालुका सचिव दीपक पाटील तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

गट आणि गणनिहाय बैठका 

महापालिकाबरोबरच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसैनिक जोरदार कामाला लागले असून गट आणि गणनिहाय आढावा बैठकांचा धडाका लावला जाणार आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख तसेच विभागप्रमुखांनी सूचना मांडत आगामी निवडणुकांमध्ये मिंध्यांना पराभवाची धूळ चारू असा निर्धार केला.