देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवा! संजय राऊत यांनी पंतप्रधानांना सुनावले

परिवर्तन घडविण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे, याची खात्री असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गल्लीबोळात फिरताहेत. सत्ता परिवर्तनाच्या भीतीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यांनी निवडणूक काळापुरती देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवावी, असा सणसणीत टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हाणला.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौंदाणे उपबाजारात शनिवारी शेतमाल खरेदी-विक्री केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खासदार संजय राऊत बोलत होते. आपल्या तडाखेबंद भाषणात त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या भ्रष्ट आणि हुकूमशाही कारभारावर सडकून टीका केली.

महाराष्ट्राप्रति द्वेषभावना असल्याने मोदी-शहांनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडून राज्यात गद्दारांचे सरकार आणले. या गुजराती व्यापाऱ्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, यासाठीच महाराष्ट्रातील रोजगार आणि उद्योग ते गुजरातमध्ये पळवीत आहेत. त्यांच्यात औरंगजेब शिरल्याने ते महाराष्ट्रावर स्वाऱया करीत आहेत; परंतु हा महाराष्ट्र आहे, औरंगजेबालाही याच मातीत गाडले होते, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला. यावेळी उपनेते अद्वय हिरे, प्रसाद हिरे, गणेश धात्रक, राजेंद्र भोसले आदींची भाषणे झाली.