वर्सोव्यात भाजपला दणका; हारुन खान भरघोस मतांनी विजयी

संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची आगेकूच असली तरी वर्सोव्यात मात्र शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशालीने भाजपची येथील दहा वर्षांची राजवट जाळून खाक केली. शिवसेनेचे उमेदवार हारुन खान यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपच्या उमेदवार भारती लव्हेकर यांना धूळ चारली.

या मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांची संख्या तब्बल 1 लाख 10 हजार आहे. त्यामुळे येथे अल्पसंख्याक उमेदवार द्यावा, अशी आग्रही मागणी येथील मुस्लिम संघटनांनी केली होती. त्यानुसार येथून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हारुन खान यांना उमेदवारी दिली. या संधीचे हारुन खान यांनी सोनेच केले. खान यांना 65,395 मते मिळाली तर लव्हेकर यांना 63,796 मते मिळाली. खान हे 1600 मतांच्या आघाडीने निवडून आले.

हारुन खान हे कट्टर शिवसैनिक आहेत. गेली 30 वर्षे ते निष्ठsने शिवसेनेचे काम करत आहेत. गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, असा त्यांचा शिवसेनेतील प्रवास आहे. त्यांनी वर्सोव्यात चांगली बांधणी केली होती. अल्पसंख्याक म्हणून ते एका समाजाचे नेतृत्व त्यांनी कधी केले नाही. प्रत्येक समाजाला ते आपलेसे वाटतात. हाकेला कधीही उभा राहणारा हक्काचा माणूस, अशी त्यांची ओळख आहे.