कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये कालीचरण महाराज यांचा एक कार्यक्रम झाला. त्यात त्यांनी मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही त्यांनी आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावरून राजकीय वाद सुरू झाला होता. या सभेशी आपला संबंध नसल्याचा दावा मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला होता. आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांचा दावा पुराव्यांसह खोडून काढत त्यांना उघडे पाडले आहे. त्यामुळे शिरसाट तोंडघशी पडले आहेत.
अंबादास दानवे यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी शिंदे गटाचे उप-जिल्हाप्रमुख संजय बारवाल यांनी या सभेसाठी मागितलेल्या परवानगीचा हा अर्ज जोडला आहे. तसेच सातारा पोलीस ठाण्याचे परवानगीचे पत्रही जोडले आहे. त्यासोबतच बारवाल आणि शिरसाट यांचा फोटोही शेअर केला आहे.या सर्व पुराव्यांवरून या कार्यक्रमाची परवानगी कोणी काढली आणि हा कार्यक्रम कोणी घेतला हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. त्यामुळे कालीचरण महाराज यांच्या सभेशी माझा संबंध नाही, असे आमदार शिरसाट कसे म्हणतील असा सवालही दानवे यांनी केला आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, आता हे पुरावे पाहून आमदार शिरसाट कसे म्हणतील की कालीचरण महाराज यांच्या सभेशी माझा संबंध नाही. हे घ्या, शिंदे गटाचे उप-जिल्हाप्रमुख संजय बारवाल यांनी या सभेसाठी मागितलेल्या परवानगीचा हा अर्ज आणि सातारा पोलीस ठाण्याचे परवानगीचे पत्र. त्यासोबत बारवाल-शिरसाट यांचा सोबतचा फोटो. यावरून हे सुर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे की परवानगी कोणी काढली, कार्यक्रम कोणी घेतला!, असे दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.