पराभवाची खात्री पटल्यानेच मिंधे सरकारने खोटी आश्वासने देणे सुरू केले; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मिंधे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. भूमिगत कार पार्किंग, पेपरफुटी, परीक्षांमधील गोंधळ, मुंबईत होणारा कमी दाबाचा पाणीपुरवठा अशा विविध विषयांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असून गृहमंत्री काय करत आहेत, असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. राज्यातील समस्यांकडे लक्ष वेधत सरकार जागे आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचेही ते म्हणाले.

ज्या ठिकाणी भूमिगत कार पार्किंग आहे, तेथे काही महत्त्वाच्या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव भूमिगत पार्किंग बंद करण्यात येते. तर अशा भूमिगत कार पार्किंगची गरज आहे काय, याचा सरकारने विचार करावा. तसेच याबाबत स्थानिकांच्या भूमिकेचाही सरकारने विचार करावा, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. अशा गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

मुंबईत बाणगंगेजवळ कंत्राटदाराने पायऱ्यांची तोडफोड केली आहे. त्याची नुकसान भरपाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्राचीन वास्तू आपण वारसा म्हणून जपत आलो आहेत. ही आपली धार्मिक स्थळे आणि श्रद्धास्थाने आहेत. अशा ठिकाणांना नुकसान पोहचवणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कारवाई करण्याची गरज आहे. याच कंत्राटदारांनी अंबरनाथ आणि महाबळेश्वरमध्ये एका बंगल्याचे काम केल्याची माहिती मिळाली आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी कोणाचेही नाव न घेता स्पष्ट केले.

राज्यात अशा घटना घडत आहे की, सरकार जागे आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. वरळीत आरो डेअरीतील कामगारांच्या इमारतीत सज्जा कोसळल्याची घटना घडली होती. आमच्या सरकारच्या काळात त्या इमारतींची डागडुजी करण्यात आली होती. तसेच त्या कामगारांना इतरत्र स्थतांलरीत करण्याची योजना होती. मात्र, ही जागा मिंधे सरकारला बिल्डरच्या घशात घालायची असल्याने गेल्या दोन वर्षात याची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी 90 कुटुंब राहतात. तिथे भेट देत आपण पाहणी करून आलो आहोत. त्या ठिकाणी फंड दिल्याचे दाखवले जाते. मात्र, तो निधी जातो कुठे, असा सवाल करत हा भ्रष्टाचार आम्ही लवकरच जनतेसमोर आणणार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. येथील 90 कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करत त्यांनी तातडीने दुसऱ्या ठिकाणी घरे देण्यात यावीत. घाटकोपर आण वांन्द्रे येथे या खात्याची काही घरे आहेत, तिथे या कुटुंबाना घरे देण्यात यावी, अशा आमची मागणी आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक आश्वासने देण्यात आली. आता त्यांच्या खोटेपणा होर्डिंग्जवरही दिसत आहे. दंहीहंडी मंडळांना विमा कवच मिळणार, शहरातील रस्ते खड्डेमुक्त होणार अशी अनेक आश्वासने देण्यात आली. त्यांचा खोटेपणा आता जनतेलाही समजला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे, याची जाणीव झाल्याने खोटा प्रचार करण्यात येत आहे. मात्र, जनता त्याला बळी पडणार नसल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या दोन वर्षात व्हायबेंट किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्रसारखा एकही उपक्रम का राबवण्यात आला नाही, राज्यातील सर्व उद्योगधंदे त्यांना गुजरातला न्यायचे आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. पहिल्याच पावसात देशातील तीन विमानतळांचे छत कोसळले, पहिल्याच पावसात राम मंदिराला गळती लागली, मुंबई गोवा, मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. टोल भरूनही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, हे खाते चांगल्याप्रकारे सुरू आहे, असे गुणगान भाजपकडून करण्यात येते. या खात्यात नेमके काय सुरू आहे, ते भाजपने सांगावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.

राज्यात महायुती आणि केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर एकही परीक्षा योग्य पद्धतीने पार पडली आहे काय, या प्रश्नाचे भाजपने उत्तर द्यावे. परीक्षेतील घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे, पुण्यात खोटे पोलिस फिरत आहे. काहीजण शस्भे घेऊन फिरत आहे, राज्यात अशी परिस्थिती असताना गृहमंत्री काय करत आहेत, असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबईत अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे नियोजन कसे करावे, हेच मिंध सरकारला माहिती नाही. डीपक्लीनसाठी पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच शहरात पाणीटंचाई जाणवत आहे. मुंबईत पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही प्रकल्प आणला होता, त्याचे पुढे काय झाले, हे देखील या भर्षट सरकारने सांगावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.