
टाटा स्मारक रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना ग्रॅच्युईटी, प्रॉव्हिडंट फंड, ग्रुप इन्शुरन्स, बोनस, ओव्हरटाईम, पगारवाढ, मेडिक्लेम पॉलिसी, वाढीव भरपगारी रजा व इतर हक्क आणि समस्यांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कंत्राटी कामगारांना जर विविध सुविधा मिळत नसतील तर याबद्दल प्रशासनाला जाब विचारून त्या सोडवू, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेना, टाटा स्मारक रुग्णालय युनिटच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी मुख्य मार्गदर्शन केले. या शिबिरास अंदाजे 500 पेक्षा अधिक पुरुष व महिला कामगार उपस्थित होते. प्रदीप मयेकर हे अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांना कंत्राटी कामगारांच्या ज्वलंत समस्यांबाबतचा प्रदीर्घ अनुभव आहे. कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने शिवसेनाप्रणीत युनियनमध्ये सामील होऊन आपली ताकद दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी युनिटचे अध्यक्ष तुकाराम गवळी, सरचिटणीस, नंदकिशोर कासकर, कार्याध्यक्ष ललित फडेकर, जगदीश सोळंकी, नितीन सातपुते, नितीन गवळी, संदीप धामणकर, सतोष शिंदे, मिलिंद नाईक, कला मकवाना, गोमती इब्राहिमपूरकर तसेच पंत्राटी कामगारांतर्फे शैलेश लोके, महिंद्र नाकटी आणि इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.