
जैतापूर प्रकल्पाचे भूत कोकणच्या मानगुटीवर कायम आहे. पर्यावरणीय मान्यता डिसेंबर 2022 मध्येच संपलेली असताना कोकणच्या निसर्गसौंदर्याची राखरांगोळी करणारा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा कोकणवासीयांच्या माथ्यावर मारण्याचा केंद्र सरकारचा मनसुबा आज शिवसेनेने संसदेत उघडा पाडला. पर्यावरणीय मान्यता नसतानाही हा प्रकल्प पुढे रेटण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
लोकसभेत आज शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी जैतापूरच्या महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला. यासंदर्भात पर्यावरणीय मान्यता मिळाली आहे का? सरकारचा नेमका इरादा काय आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याला गोलमाल उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेली पर्यावरणीय मान्यता डिसेंबर 2022 मध्येच संपुष्टात आल्याचे मान्य केले, मात्र नवी मान्यताही लवकरच मिळेल, अशी लोणकढी थापही मारली. या प्रकल्पाला असणारा स्थानिकांचा विरोध आणि कोकणच्या निसर्गसौंदर्यासोबतच इतर बाबींवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता जैतापूर प्रकल्पाचे स्थळ बदलण्याबाबत सरकार काही विचार करत आहे काय? असा प्रतिसवाल खासदार देसाई यांनी केला. त्यावरही जितेंद्रसिंग यांनी धडपणे उत्तर दिले नाही, मात्र जैतापूरमध्येच अणुऊर्जा प्रकल्प होईल, असे स्पष्ट संकेत दिले. जैतापूरमध्ये प्रकल्प झाल्यास पर्यावरण व निसर्गसौंदर्याची तर हानी होईलच, शिवाय हा भूभाग भूपंपप्रवण आहे. त्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते या गंभीर बाबीकडेही खासदार देसाई यांनी या वेळी सभागृहाचे लक्ष वेधले. जैतापूर परिसरात यापूर्वी भूपंपाचे तीव्र धक्के बसले होते. त्यामुळे या ठिकाणी प्रकल्प करणे म्हणजे अनेकांच्या जिवाशी खेळणे आहे, असा इशाराही खासदार देसाई यांनी दिला.
परभणीकरांसाठी वंदे भारत ट्रेन सुरू करा
परभणीहून आळंदी आणि देहू येथे जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. त्याचबरोबर पुण्यात शिक्षण व नोकरीधंद्यानिमित्ताने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. परभणीला पुण्याशी जोडणाऱ्या केवळ दोनच रेल्वेगाडय़ा आहेत. त्यामुळे या गाडय़ा नियोजित वेळेवर येत नाहीत. प्रवाशांना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जालना ते पुणे या सध्या सुरू असलेल्या वंदे भारत रेल्वेला परभणीपर्यंत जोडण्यात यावे तसेच नांदेड ते पुणे वंदे भारत रेल्वे परभणीमार्गे सुरू करावी व प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी लोकसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासांत खासदार जाधव यांनी परभणीकरांच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.