मराठीसाठी शिवसेना आक्रमक; अरेरावी करणाऱ्या स्विगीला दाखला हिसका, मराठीद्वेष्ट्या व्हिवो कंपनीलाही इशारा

मराठी भाषेसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. अरेरावी करत मराठी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या स्विगीला आज शिवसेनेच्या शिवसंचार सेनेने हिसका दाखला. मराठीद्वेष्टय़ा व्हिवो कंपनीलाही दणका देत महाराष्ट्रात व्यापार करायचा असेल तर मराठी भाषेला प्राधान्य द्यावेच लागेल, असा जोरदार इशाराही दिला.

स्विगीच्या डिलिव्हरी एजन्सींची पार्श्वभूमी तपासली जात नाही. ऑर्डरमध्ये ग्राहकांची फसवणूक केली जाते. हॉटेलची माहिती लपवली जाते. स्विगीच्या ग्राहक सेवा यंत्रणेत अनेक त्रुटी आहेत. त्याबाबत ग्राहकांकडून विचारणा झाल्यास स्विगीचे अधिकारी अरेरावीची उत्तरे देतात अशा तक्रारी शिवसंचार सेनेकडे आल्या होत्या. स्विगीच्या या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेनेचे राज्य संघटक व शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी पदाधिकाऱ्यांसह आज स्विगीच्या मरोळ येथील कार्यालयावर धडक दिली. ही अरेरावी बंद केली नाही तर मुंबईत स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजना फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

महाराष्ट्रात व्यवसाय करताना इथल्या मातृभाषेचा आणि मराठी ग्राहकांचा आदर राखणे हे कंपनीचे कर्तव्य आहे असे बजावतानाच काही सूचना शिवसंचार सेनेकडून व्हिवो कंपनीला केल्या गेल्या. त्या अंमलात आल्या नाहीत तर पुढील परिणामांची जबाबदारी पूर्णतः ‘व्हिवो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ची असेल, असा इशाराही देण्यात आला. त्यासंदर्भातील पत्र शिवसंचार सेनेकडून व्हिवो कंपनीला देण्यात आले.