शिवसेना खासदार संजय दीना पाटील यांना हायकोर्टाचा दिलासा, खासदारकीला आक्षेप घेणारी याचिका फेटाळली

शिवसेना खासदार संजय दीना पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून आज दिलासा मिळाला. एका टॅक्सीचालकाने पाटील यांच्या खासदारकीला आक्षेप घेत हायकोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने फेटाळली.

लोकसभा निवडणुकीत उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून विजयी झालेले खासदार संजय दीना पाटील विजयाला टॅक्सीचालक शहाजी थोरात यांनी आक्षेप घेत याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने, या याचिकेत इतर 18 उमेदवारांना प्रतिवादी करणे आवश्यक होते; मात्र याचिकाकर्त्यांनी तसे केले नाही असे निरीक्षण नोंदवत 26 नोव्हेंबर 2024 रोजी याचिका फेटाळली होती. त्यानंतर थोरात यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रोस्पर डिसूझा यांनी युक्तिवाद करताना निवडणुकीत भ्रष्टाचाराचा अवलंब करण्यात आल्याचा दावा केला. तसेच सरकारी कागदपत्रांवर वडिलांच्या नावासह आईचे नाव वापरणे बंधनकारक असताना पाटील यांनी ही नावे नमूद केली नाहीत म्हणून त्यांची उमेदवारी रद्दबातल ठरविण्यात यावी. अशी मागणी केली. संजय पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. विजय नायर आणि अ‍ॅड. प्रशांत कुलकर्णी यांनी युक्तिवाद करत याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळला. न्यायालयाने याची दखल घेत याचिकेच्या गुणवत्तेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.