
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध नागरी समस्या सोडवाव्यात यासाठी आज खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील धुळीचा प्रश्न, विविध मैदाने व उद्यानांचे सुशोभीकरण, माहीम विधानसभा परिसरातील अपुरा व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, धारावी, चेंबूर, वडाळा परिसरातील विविध नागरी समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. यावेळी माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश सावंत, माजी महापौर मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, माजी नगरसेविका प्रीती पाटणकर, मरीअम्मल तेवर, उर्मिला पांचाळ, वसंत नकाशे, विठ्ठल पवार, राकेश देशमुख, सिद्धार्थ चव्हाण, संजय भगत, प्रवीण नरे, गंगा देरबेल यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.