वर्ल्ड कप विजेत्यांसाठी गुजरातहून बस आणून नेमकं काय दाखवू इच्छिताय? संजय राऊत यांचा सवाल

‘टीम इंडिया’च्या वर्ल्ड कप विजयानंतर मुंबईत काढलेल्या जल्लोषी रॅलीत गुजरातची बस वापरण्यात आल्याने मुंबईकरांसह महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. वर्ल्ड कप विजेत्यांच्या मुंबईतील स्वागत रॅलीसाठी गुजरातहून बस आणून नेमके काय दाखवू इच्छिताय? असा सवाल संजय राऊत यांचा भाजपला विचारला आहे.

‘टीम इंडिया’च्या विजयी परेडसाठी गुजरातमधून बस आणून महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबईत बसेस आहेत. पण सर्वकाही गुजरात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पंतप्रधान करत आहे. महाराष्ट्र मोठे औद्योगिक राज्य आहे आणि मुंबईत काय नाही. आमच्याकडूनच तर तुम्ही शिकलात ना, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, मुंबई क्रिकेट असोसिएशनने यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजे. तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे. तर त्यांना ही वेदना झाली पाहिजे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीने आक्षेप घेतला पाहिजे होता. माझ्या माहितीप्रमाणे रोहित शर्मा मुंबईतला खेळाडू आहे. बरेच खेळाडू मुंबईतले आहेत. मुंबई इंडियन्सचे आहेत. पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातमधून बस आणावी लागते हे तुम्ही काय दाखवू इच्छिताय? असा सवालही राऊत यांनी केला.

यापूर्वी अशाप्रकारे संघ किंवा उत्सव झाले तेव्हा मुंबईने त्यांचे जोरदार केले. बेस्टच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत. जर नसती तर एका रात्रीत बनवून घेतली असती, एवढी मुंबईची क्षमता आहे. पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली. म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवताय का? असा खडा सवाल राऊत यांनी केला.

हिंदुस्थानी क्रिकेट संघाला भेटण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ आहे. मी असं म्हणणार नाही भेटू नका. भेटले पाहिजे, त्यांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे, त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. पण ज्या राज्यातून तुम्ही लोकसभेत जिंकून आलात त्या राज्यात सर्वात मोठी घटना घडली तिथे जाऊ शकत नाही. मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही. जिथे विजय असतो तिथे मोदी जातात, दुःखाच्या ठिकाणी जात नाहीत. ‘हे आपले पंतप्रधान आहेत, त्यांना झेलावंच लागेल’, अशी खरमरीत टीकाही राऊत यांनी केली.

…याचमुळे मुंबईत भाजपचा दारुण पराभव

वाराणसीमध्ये यामुळेच मोदींना पराभव म्हणता येणार नाही पण, निसटता विजय मिळाला. वाराणसीमधील सर्व ठेकेदारी गुजराती लोकांच्या हातात आहे. त्याच चिडीतून वाराणसीत लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोदी थोडक्यात बचावले. मुंबईतसुद्धा भाजपचा दारुण पराभव याचमुळे झालेला आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई सर्वकाही आहे. मुंबईतून लूट होऊन गुजरातला जातेय. त्यामुळे एक बस आली ठीक आहे, पण ही वृत्ती दिसते, असा घणाघातही राऊत यांनी केला.

जेव्हा सरकार बदलेल तेव्हा सर्व लक्षात ठेवू

सध्या ईडी आणि सीबीआयचा वापर करून देशात जे दबावतंत्र सुरू आहे, त्याचाही राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. हेमंत सोरेन यांना मोदी-शहा यांच्या दबावाखाली ईडी आणि सीबीआयने अटक केली. सोरेन यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा होऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले. मग एका मुख्यमंत्र्याला तुम्ही अटक कशी केली? असा सवाल करत ईडी आणि सीबीआयच्या संचालकांवर कायदेशीर खटला चालवण्याची मागणी राऊत यांनी केली. संजय सिंहवर खटला नाही चालत, संजय राऊत यांच्यावर कोणतीही मनी लाँड्रिंगची केस चालत नाही, हे कोर्ट म्हणतंय. आणि तुम्ही राजकीय दबाव टाकून आम्हाला अटक करता, धमक्या देता. जेव्हा हे सरकार बदलेल तेव्हा हे सर्व लक्षात ठेवले जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.