मोदींचा भविष्यातील नारा ‘नो नेशन, नो इलेक्शन’ असेल, संजय राऊत यांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भविष्यातील नारा ‘नो नेशन, नो इलेक्शन’ असेल, ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या माध्यमातून त्यांचा तोच प्रयत्न सुरू आहे, असा आरोप शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ म्हणता मग आधी महानगरपालिका आणि राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा महाविकास आघाडीचा सुरुवातीपासूनच आरोप आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या माध्यमातून तोच प्रयत्न होतोय, असे संजय राऊत म्हणाले. संविधान निर्मात्यांनी लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी घटनेमध्ये करून ठेवल्या आहेत. त्याच तरतुदींवर मोदी सरकार हल्ला करतेय, असे ते म्हणाले.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ संसदेत मांडले जाणार आहे. तत्पूर्वी इंडिया आघाडी त्यावर सविस्तर चर्चा करेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. देशात एकाच वेळी निवडणुका घेतल्यास कमी खर्च येईल असे मोदी सांगतात. याबाबत माध्यमांनी संजय राऊत यांना विचारले असता, मोदी अर्थतज्ञ कधी झाले, असा सवाल खासदार राऊत यांनी केला.