मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी परिसरातील वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. येथून हजारो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. या ठिकाणी पूर्व दिशेला बसविण्यात आलेले सरकते जिने हे वारंवार बंद पडत असल्याने सकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होते. पिण्याच्या पाण्याची तसेच शौचालयाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
जोगेश्वरी पूर्वेकडे प्रामुख्याने मध्यमवर्गीय वस्ती आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित बाहेर जाणाऱ्या रहिवाशांना रेल्वेने प्रवास करण्यावाचून पर्याय नाही. मात्र, जोगेश्वरी रेल्वे स्थानकातील अपुऱ्या पयाभूत सुविधांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत अनेक तक्रारी देण्यात आल्या आहेत; परंतु रेल्वे प्रशासनाकडून सदर तक्रारींवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात न आल्यामुळे प्रवाशांच्या मनात रेल्वे प्रशासनाविरुद्ध मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात आमदार बाळा नर यांनी स्टेशनमास्तरांची भेट घेऊन जोगेश्वरीतील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने दूर करण्याची मागणी केली. यावेळी जोगेश्वरी विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, उपविभागप्रमुख जयवंत लाड, महिला उपविभाग संघटक दीपाशा पवार, शाखाप्रमुख अमर मालवणकर, विशाल येरागी, संजय सावंत, शिवराम प्रभू, उमेश राणे, आकांक्षा माळकर, मंगेश पवार, शुभम एरोंडोळ, शैलेश बांदेलकर उपस्थित होते.
- जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडे, तसेच फलाट क्रमांक 1, 2 आणि 3, 4 रेल्वे स्थानकावरून वर चढण्यासाठी सरकते जिने उपलब्ध करून द्यावेत.
- हार्बर लाईनकडे जाण्यासाठी पोचरस्ता तयार करणे.
- रेल्वे टिकीट आरक्षण केंद्राच्या जवळ उत्तर आणि दक्षिण या ठिकाणी उपलब्ध जागेवर शौचालय बांधण्यात यावे.
- जोगेश्वरी पश्चिमेला उतरण्यासाठी असलेला पायऱ्यांची दुरुस्ती करा. जोगेश्वरी रेल्वे स्थानक ते राम मंदिर रेल्वे स्थानक दरम्यान अस्तित्वात असलेला नाल्याची रेल्वे प्रशासनाकडून योग्य ती साफसफाई तसेच डागडुजी करण्यात यावी.
- रेल्वे स्थानकाच्या सर्व प्लॅटफॉमवर उर्वरित भागावर लवकरात लवकर छप्पर बसविण्यात यावे.