अल्लू अर्जूनला अटक, पण महाराष्ट्रात खून, अपहरण खंडणीचे गुन्हे करणाऱ्याना सरंक्षण; संजय राऊत यांचा टोला

हैदराबादमध्ये अल्लू अर्जूनला अटक झाली, पण महाराष्ट्रात दिवसाढवळ्या खून अपहरण खंडणीचे गुन्हे करणाऱ्याना सरंक्षण दिले जात आहे. अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

हैदराबादमध्ये पुष्पा २ च्या स्क्रीनींगवेळी एका महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जूनला अटक केली होती. यावरून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे कौतुक केले. पवन कल्याण म्हणाले की रेवंथ रेड्डी हे मातीशी जोडलेले नेते आहेत. ते एक जबाबदार आणि नेहमी माहिती ठेवणारे नेते आहे. अल्लू अर्जून प्रकरणी त्यांनी कायदेशीर कारवाई केली. अल्लू अर्जूनच्या ऐवजी मी असतो तर मलाही अटक केली असती असे कल्याण म्हणाले.

ही बातमी रीट्वीट करून संजय राऊत म्हणाले की, आणि आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय?
एका हत्येस अप्रत्यक्ष जबाबदार ठरल्याने अल्लू अर्जुन या सुपरस्टार ला अटक झाली. इकडे दिवसाढवळ्या खून अपहरण खंडणी चे गुन्हे करणाऱ्याना सरंक्षण दिले जात आहे, असे म्हणत संजय देशमुख हत्या प्रकरणी संबंधित आरोपी वाल्मीक कराडवरून संजय राऊत यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे
तसेच हैद्राबाद येथे भाजपचे राज्य नाही! असेही संजय राऊत म्हणाले.