
मोबदला न देता शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीवरून रस्ता करण्यात येणाऱ्या करमाड-लाडसावंगी रस्ता रुंदीकरण प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. संबंधित प्रकरणी आज 26 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुधड येथे अंबादास दानवे यांनी शेतकरी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
करमाड-लाडसावंगी रस्ता रुंदीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. भांबर्डा, दुधड, पिंपळखुटा, लाडसावंगी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यालगत असून, त्यात मागील 60 वर्षांपूर्वी जिल्हा महामार्ग तयार करण्यात आला होता. तेव्हा काही ठिकाणी जमिनीचे भूसंपादन झालेले आहे. तर काही ठिकाणी झालेले नाही. तरीही हा महामार्ग जिल्हा महामार्गावरून कोणत्याही शेतकऱ्यांची सहमती न घेता राज्य महामार्ग दर्जा देऊन रुंदीकरण काम सुरू करण्यात आले आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी न्याय देण्यासंदर्भातली मागणी शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केली.
करमाड लाडसावंगी महामार्गावर विस्तारीकरण होत आहे. 1971, 81 जिल्हा मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र, त्याच महामार्गास कोणत्याही प्रकारचे भूसंपादन न करता राज्य सरकार राज्य महामार्ग दर्जा देऊन विनाभूसंपादन जमीन हडपण्याचे काम संबंधित विभागाकडून केले जात असल्याची तक्रार भांबर्डा, दुधड, पिंपळखुटा, लाडसावंगी येथील शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केली.
राज्य महामार्ग म्हणून विस्तारीकरण करायचे असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांना मोबदला देऊन हा महामार्ग राज्य महामार्ग रुंदीकरण करून तयार करावा. अन्यथा शेतकऱ्यांवर अन्याय करू नये, शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही कायम उभे राहिलो आहे. पुढेही राहू, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द यावेळी अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिला.
परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासह बाजार भावानुसार मोबदला मिळून देण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरेल. तसेच शासन स्तरावर सुद्धा पाठपुरावा करून संबंधित खात्याच्या सचिव यांच्यासोबत मुंबई येथे पुढील काही दिवसांत बैठक घेऊ, अशी ग्वाही अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुकाप्रमुख शंकरराव ठोंबरे व सूत्रसंचालन एकनाथ चौधरी यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना किसान सेना जिल्हा संघटक नानासाहेब पळसकर, उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, मदन चौधरी, सांडू मते पाटील, बबनराव वाघ, रवींद्र पडूळ, कौतिक डवणे, महेंद्र खोतकर, कपिंद्र पेरे, एकनाथ चौधरी, तेजराव शिंदे, सरपंच गंगासागर चौधरी, युवासेनेचे विशाल चौधरी, गणेश वाघमारे, गणेश दांगडे व प्रकाश दाभाडे उपस्थित होते.