![aaditya thackeray bmc](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/aaditya-thackeray-bmc--696x447.jpg)
मुंबादेवी मंदिर परिसरात सुमारे 200 वर्षांपासून व्यवसाय असणारी दुकाने, कॉरिडोर प्रकल्पाच्या नावाखाली भाजपच्या लाडक्या कंत्राटदाराच्या घशात घालू नका, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे आज केली. या योजनेला मुंबादेवी मंदिर, स्थानिक रहिवासी आणि दुकानदार यांचा प्रचंड विरोध असून स्थानिकांचे हक्क आणि जीवनमान धोक्यात घालू नका, असेही ते म्हणाले. मुंबईतील विविध समस्यांबाबत आदित्य ठाकरे यांनी आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी मुंबादेवी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाबरोबर इतर प्रकल्प अदानीमुळे मुंबईकरांवर लादण्यात येऊ नये तसेच रस्त्यांची कामे देण्याआधी रस्त्यांचे ऑडिट करा, अशी मागणी करत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, करण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत आयुक्त सकारात्मक आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे, मुंबादेवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
भाविकांसाठी सुविधा निर्माण करा!
दुकाने न हटवता, स्थानिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देता मंदिर परिसराचा विकास करणे शक्य आहे. मुंबईची ग्रामदेवता असलेल्या मुंबादेवीच्या दर्शनासाठी हजारो लोक दररोज येत असतात त्या भाविकांसाठी विविध सुविधा निर्माण करा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
काय आहे प्रकरण
मुंबादेवी मंदिर परिसराचा विकास केला जाणार असून मंदिराच्या पाठीमागे 17 मजली पार्किंगची इमारत उभारण्यात येणार आहे. याचे काम भाजपच्या एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र, हा विकास करताना स्थानिक दागिना बाजारांतील दुकाने हटवण्यात येणार आहेत. याला मंदिर ट्रस्ट, स्थानिक आणि दुकानदारांचा प्रचंड विरोध आहे.
लाडक्या बहिणीची मतदानासाठी गरज असताना त्यांची मते मागितली. मात्र, आता गरज सरल्यानंतर अनेक कारणे देत लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येत आहे. आता त्यांच्या हातावर बांधलेल्या राख्या जड झाल्या आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
पालकमंत्री नाही तर त्यांना मालकमंत्री व्हायचे आहे
निवडणुकीनंतर तीन महिने झाले तरी महायुतीतील भांडणे काही संपत नाहीत. प्रत्येकाला पालकमंत्री पद हवे आहे. मात्र, भाजप आणि मिंधे गटातील आमदारांना पालकमंत्री नाही तर त्या जिल्ह्यांचे मालकमंत्री व्हायचे आहे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
झोपड्यांमधील छोट्या व्यावसायिकांना जाणूनबुजून त्रास दिला जातोय!
धारावीतील छोटे व्यावसायिक जे आपल्या रहिवासी गाळ्यातून छोटा व्यवसाय करतात. अशा दुकानदारांना त्यांच्यावर मालमत्ता कर लावून त्रास दिला जात आहे. संपूर्ण मुंबईतून झोपडपट्टीतील दुकानदारांना काढून टाकण्यासाठी त्यांच्यावर मालमत्ता कर लावण्यात येणार आहे. हे देखील अदानी व विकासक यांच्या फायद्यासाठी असून आम्ही याचा ही विरोध करतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईतून मराठी सण पुसून टाकायचे आहेत
भाजपला हिंदूंचा कुंभमेळा चालतो. मात्र, मुंबईतील गणेशोत्सव चालत नाही. मूर्तींमुळे प्रदूषण वाढते, असा दावा केला जातोय. मात्र, भाजपला प्रचाराच्या वेळी हिंदुत्व आठवते. पण प्रचार संपला की आठवत नाही. भाजपला गणेशमूर्तींना विसर्जनाची परवानगी न देऊन मराठी सण पुसून टाकायचे आहेत. याबाबत भाजपची भूमिका ही नेहमी दुटप्पी राहिली आहे. मुख्यमंत्रीही याबाबत एक शब्द बोलायला तयार नाहीत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.