शेतमजुराच्या मुलाला शिवसेनेने दिला इंग्रजी शाळेत प्रवेश; पक्षप्रमुखांनी दिलेला शब्द शिवसैनिकांनी पाळला

निपाणी शिवारातील बांधावर शेतमजुराच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना घेईल, असा शब्द शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. निपाणी येथील ईश्वर पांडुरंग भालेकर या मुलाला इंग्रजी शाळेत प्रवेश मिळवून देत शिवसैनिकांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरात शिवसंकल्प मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी तालुक्यातील निपाणी शिवारातील बांधावर जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला होता. शेतात काम करण्यासाठी आलेल्या कुंदाबाई पांडुरंग भालेकर यांच्यासोबत त्यांचा मुलगाही आला होता. त्याच्याशी संवाद साधला असता त्याने शाळेत जात नसल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेश घेता येत नसल्याचे कुंदाबाईने सांगताच या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात येईल, असा शब्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी तत्काळ तालुकाप्रमुख आनंद भालेकर यांना याबाबत सांगितले. त्यानुसार भालेकर यांनी ईश्वर भालेकर या मुलाला गायकवाड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. ईश्वरला मोठ्या इंग्रजी शाळेत प्रवेश मिळाल्याने त्याची आई कुंदाबाई, वडील पांडुरंग यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

बाहेरून इमारती पाहात होतो…
निपाणी शिवारामध्ये इंग्रजी शाळांच्या टोलेजंग इमारती उभ्या असून त्याची फी आमच्या आवाक्यात नसल्यामुळे या शाळांमध्ये मुलाला प्रवेश द्यायचा विचारही करू शकत नव्हतो. आम्ही येता-जाता या शाळांच्या इमारती पाहत होतो. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यासारख्या गोरगरिबांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्यामुळेच आज आमच्या मुलाला या मोठ्या शाळेत प्रवेश मिळाला, असे सांगताना कुंदाबाई पांडुरंग भालेकर यांचे डोळे पाणावले होते.

भालेकर दाम्पत्याला दोन मुले आहेत. मोठा मुलगा आकाश हा गावातील जिल्हा परिषद शाळेत सहावीमध्ये शिकत आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे, तालुकाप्रमुख आनंद भालेकर यांनी लक्ष घातले आणि ईश्वरच्या दहावीपर्यंतच्या सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली. त्यामुळे आम्ही आनंदी असून मला फक्त ईश्वरला डबाच करून द्यायचा आहे. बाकी सर्व शिवसेना करणार असल्याचा अभिमान आहे, असे कुंदा भालेकर यांनी सांगितले.

साहेबांचा शब्द महत्त्वाचा
शिवसेना पक्षप्रमुख निपाणी शिवारात आले. त्यांनी शेतकरी, शेतमजुरांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यामुळे या भागातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. ईश्वर भालेकर या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे मला सांगितले. साहेबांनी दिलेला शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण ईश्वरला प्रवेश मिळवून दिला असून, त्याच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घेतली असल्याचे तालुकाप्रमुख आनंद भालेकर यांनी सांगितले.

निपाणीसाठी विशेष सूट
निपाणी, भालगाव, आपतगाव परिसरात मोठ्या इंग्रजी शाळा उभ्या आहेत. या शाळांत प्रवेश मिळविणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. असे असले तरी आम्ही निपाणी या गावातील मुलांना विशेष सूट देतो, असे गायकवाड ग्लोबल स्कूलचे पंढरीनाथ गायकवाड म्हणाले.