आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन; शिवतीर्थावर निष्ठावंतांची वारी

ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता अंगार आणि अखंड हिंदुस्थानचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा रविवार, 17 नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन असल्याने मुंबई-महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातून निष्ठावंतांची ‘वारी’च शक्तिस्थळावर नतमस्तक होणार आहे. शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक, शिवप्रेमी आणि नागरिक येणार असल्याने शिवसेना आणि पालिकेकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांचे दैवतच! त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे शिवतीर्थावरील स्मृतिस्थळ म्हणजे शिवसैनिकांसाठी शक्तिस्थळ ठरले आहे.  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात ज्वलंत हिंदुत्वाचे स्फुलिंग चेतवले. मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणसाला स्वाभिमानाने, ताठ मानेने जगण्याचा मंत्र दिला. शिवसेनाप्रमुखांनी देव, देश आणि धर्मासाठी झोकून देणाऱया पिढय़ा निर्माण केल्या. लाखो, करोडो लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी निर्माण केली. अशा तेजस्वी आणि शिवतेज असलेल्या उत्तुंग नेत्याचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाले. अवघा देश हळहळला. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाणदिनी केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून जथेच्या जथे दरवर्षी त्यांना वंदन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने येत असतात.

शिवतीर्थ भगवेमय, चाफ्याचा दरवळ

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर ठिकठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आल्यामुळे परिसर भगवामय झाला आहे. शिवाय पालिकेच्या माध्यमातून शक्तिस्थळावर फुलांची आकर्षक सजावट करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या सोनचाफ्यांच्या फुलांनी शक्तिस्थळ सजवण्यात आल्याने चाफ्याचा मनमोहक दरवळ सर्वत्र पसरला आहे.