माजी आमदार सीताराम दळवी यांचे निधन

शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शीला, मुलगा संदीप, मुलगी प्रतिमा, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सीताराम दळवी यांच्या निधनाने शिवसेनेचा जुना शिलेदार गमावला, अशी हळहळ व्यक्त होत आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते. शिवसेनेच्या उमेदीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात सीताराम दळवी यांचा सहभाग होता. शिवसेना मुंबई उपनगरात रुजवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. 1995 साली अंधेरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर ते विजयी झाले होते. त्यापूर्वी मुंबई महापालिकेत ते नगसेवक होते. कोकणातील सिंधुदुर्ग जिह्यातील आरोस हे त्यांचे मूळ गाव असून त्यांचे अंधेरी पूर्व येथे त्यांचे अखेरपर्यंत वास्तव्यास होते. सीताराम दळवी यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.