
वरळी-शिवडी कनेक्टरच्या प्रकल्पबाधित रहिवाशांच्या हक्कासाठी शिवसेनेने लढा कायम ठेवला आहे. एल्फिन्स्टन पूल परिसरातील 19 इमारतींतील रहिवाशांप्रमाणे शिवडीतील प्रकल्पबाधित 130 कुटुंबांचे त्यांचे घर असलेल्या परिसरातच पुनर्वसन करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने मंगळवारी एमएमआरडीएकडे केली.
शिवडी परिसरातील प्रकल्पबाधित रहिवाशांना रेडिरेकनरप्रमाणे तुटपुंजी रक्कम देऊन मुंबईबाहेर ढकलण्याचे कारस्थान एमएमआरडीए करीत आहे. मंगळवारी एमएमआरडीएने पुन्हा आर्थिक मोबदला देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला रहिवाशांतर्फे शिवसेनेने तीव्र विरोध केला आणि प्रकल्पबाधितांचे त्याच परिसरातच पुनर्वसन करण्याची मागणी केली.
शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या पुढाकाराने उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे अधिकारी आणि प्रकल्पबाधित रहिवाशांसमवेत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक सचिन पडवळ, उर्मिला पांचाळ उपस्थित होते. एलफिस्टन पुलाजवळील प्रकल्पबाधित रहिवाशांना त्याच परिसरात पुनर्वसन योजना राबवून घरे दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर शिवडीतील हनुमान नगर, सेना नगर, एकात्मता फुले वसाहत या ठिकाणच्या 130 प्रकल्पबाधित कुटुंबांना त्याच परिसरात घरे बांधून द्यावीत, अशी प्रमुख मागणी संयुक्त बैठकीत करण्यात आली.