‘ड्रग्जमुक्त कोथरूड’ची वेळ कोणामुळे आली? शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना सवाल

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘ड्रग्जमुक्त कोथरूड’ अभियान उद्यापासून सुरू केले आहे. त्याचा खरपूस समाचार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतला असून, ‘ड्रग्जमुक्त कोथरूड’ असा कार्यक्रम घेण्याची वेळ का आणि कोणामुळे आली? असा सवाल केला आहे.

‘कोथरूडमध्ये मागील 10 वर्षे आमदार भाजपचे, खासदार भाजपचे, पुणे महापालिकेत एकहाती सत्ता भाजपची आणि तरीही तुम्ही ही पुण्याची झालेली दशा सगळ्यांसमोर जाहीर केली, हे एक प्रकारचे तुमच्या कामाचे अपयश आपणास मान्य करावे लागेल. आणि गृह खात्याचे निघालेले एक प्रकारचे धिंडवडेच म्हणावे लागतील,’ असे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी म्हटले आहे.

‘मागील वर्षभरात जेवढा ड्रग्जचा साठा पोलिसांनी पकडला आहे, त्याचे मुख्य केंद्र हे गुजरात आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हे कसे विसरून चालेल? ‘ड्रग्जयुक्त कोथरूड’ कोणामुळे झाले, हे मुख्यत्वे ध्यानात घेणे आवश्यक आहे. आज आपल्यावर ‘ड्रग्जमुक्त कोथरूड’ असा कार्यक्रम घेण्याची वेळ का आली? कोथरूड पूर्वी असे नव्हते. सुसंस्कृत, शांत, विकासात्मक परिसर अशी कोथरूडची ओळख होती. कोथरूडमध्ये मोठ्या प्रमाणावर शाळा-कॉलेज आहेत. पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे. देशाच्या सर्व राज्यांतील विद्यार्थी ज्ञानग्रहण करण्यासाठी येथे येतात. तसेच हा ड्रग्जचा व्यापार आणि गुटखाबंदी असताना गुटख्याचा व्यवसाय, हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे या भागात इतकी वर्षे सुरू आहे. याला जबाबदार दादा, आपणच आहात ना?’ अशी विचारणा मोरे यांनी केली आहे.

‘अनेक गुंड प्रवृत्तींची ये-जा सध्या आपल्या बंगल्यावर आणि सध्याच्या मंत्र्यांच्या दरबारात असते, ही खुली चर्चा पुण्यात सध्या होत आहे. मग यावर अंकुश कोण लावणार? ज्यांच्यापासून पुणेकरांचे रक्षण करणे गरजेचे आहे, त्यांनाच तुम्ही पाठबळ देत आहात. मग हे असले घाणेरडे प्रकार वाढणारच ना! मीही एक पुणेकर नागरिक या अनुषंगाने आपणास आवाहन करतो की, नुसता कार्यक्रम घेऊन ही मोहीम हाती घेऊन चालणार नाही. कोथरूडची सांस्कृतिक ओळख प्रथम शिवसेनेने करून दिली, ती तुम्ही पुसून टाकलीत,’ याकडेदेखील मोरे यांनी चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले आहे.