मंत्रालयाशेजारी मराठीची गळचेपी! शिवसेनेने ‘स्टारबक्स’ला दिला दणका, इंग्रजी नामफलकाला काळे फासले

मुंबईत एकीकडे भूमिपुत्र मराठी माणसांवर अन्याय, हल्ले, मारहाणीच्या घटना घडत आहेत. याचदरम्यान दुसरीकडे मराठी भाषेची गळचेपी सुरू आहे. चर्चगेट परिसरातील मंत्रालयाजवळील ‘स्टारबक्स’ या कॉफी रेस्टॉरंटने मराठी नामफलकाची सक्ती असतानाही इंग्रजीत नामफलक लावला. त्याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मंगळवारी ‘स्टारबक्स’च्या इंग्रजी नामफलकाला काळे फासले.

महाराष्ट्रात मराठी भाषेत नामफलक लिहिण्याची सक्ती असताना इंग्रजी नामफलक लावणाऱ्या ‘स्टारबक्स’च्या व्यवस्थापनाला शिवसेनेने जाब विचारला. याच वेळी ‘स्टारबक्स’च्या इंग्रजी नामफलकाला काळे फासण्यात आले. शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12चे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मराठी नामफलकासाठी दोन दिवसांची मुदत

‘स्टारबक्स’च्या व्यवस्थापनाने पुढील दोन दिवसांत इंग्रजी नामफलकाच्या जागी मोठय़ा अक्षरांत मराठी भाषेतील नामफलक न लावल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा शिवसेना कार्यकर्त्यांनी कॉफी रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाला दिला.