
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकताच एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला. यावेळी त्यांना जी सीट देण्यात आलेली होती, ती सीट तुटलेली होती. त्या बद्दल शिवराज सिंह चौहान यांनी नाराजी व्यक्त केली असून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी टाटा कंपनीलाही फटकारले आहे.
”आज मला भोपाळहून दिल्लीला जायचे होते. त्यासाठी मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 या विमानाचे तिकीट बुक केले होते. मला 8 नंबरची सीट मिळालेली. मी माझ्या जागेवर जाऊन बसलो आणि बसताच मला धक्का बसला. ती सीट तुटलेली व खाली दबलेली होती. मला बसायला त्रास होत होता. मी जेव्हा याबाबत विमानातील कर्मचाऱ्यांना विचारले. तेव्हा त्यांनी आम्ही ही सीट कुणालाही देऊ नका असे कळवलेले असतानाही व्यवस्थापनाने ती सीट दिली असे स्पष्टीकरण दिले. त्या विमानात आणखीही काही सीट्स तुटलेल्या अवस्थेत होत्या. मला वाटलेलं की टाटा व्यवस्थापनाने एअर इंडिया विकत घेतल्यानंतर त्यांची सेवा सुधारेल, पण तो माझा भ्रम होता, अशी टीका चौहान यांनी या पोस्टमधून केली.
”एखाद्या प्रवाशाकडून तिकीटाचे पूर्ण पैसे वसूल करून त्यांना अशा खराब सीटवर बसायला लावणे हे कितपत नैतिकतेला धरून आहे. हि त्यांची फसवणूक नाही का? किमान यानंतर तरी एअर इंडियाने प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून पाऊल उचलेल की प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा उचलेल, अशी टीका चौहान यांनी केली.