मोबाईलवर मॅच बघत एसटी चालवणारा चालक बडतर्फ, प्रवासी सुरक्षेसाठी परिवहनचे कठोर पाऊल; कंपनीला ठोठावला पाच हजारांचा दंड

एसटीची ई-शिवनेरी बस चालवताना मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणे चालकाला चांगलेच महागात पडले. अशा कृत्याचा प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर धोका पोहोचू शकतो. या अनुषंगाने एसटी महामंडळाने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आणि चालकाला थेट सेवेतून बडतर्फ केले. तसेच संबंधित कंपनीला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
दादर येथून स्वारगेटला निघालेल्या खासगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळ्याजवळ बस चालवत व्हिडीओ प्रवाशांनी बनवला आणि तो वरिष्ठ प्रशासनाला पाठवला. त्यावर परिवहनमंत्र्यांनी तातडीने नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महामंडळाने चालकाला प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी बडतर्फ केले. तसेच संबंधित खासगी संस्थेला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामंडळाने चालकाविरुद्ध बडतर्फीची कठोर कारवाई केल्याची माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

परिवहन विभागाकडून लवकरच नवी नियमावली
खासगी तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचे चालकदेखील कानात हेडफोन घालून गाडी चालवतात. अनेक चालक टॅक्सी वा इतर चारचाकी वाहन चालवताना मोबाईलवर क्रिकेट सामने वा चित्रपट पाहत असतात. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. अशा चालकांवर निर्बंध आणण्यासाठी परिवहन विभाग लवकरच नवीन नियमावली निश्चित करणार आहे.