शिवकालीन वाघनखे साताऱ्यातून नागपूरला रवाना, सात महिन्यांत पाच लाख शिवभक्तांनी घेतले दर्शन

लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममधून करारावर आणलेली व सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवलेली शिवकालीन वाघनखे आज सात महिन्यांनी कडेकोट व्यवस्थेत नागपूरला रवाना झाली. सातारला जवळपास पाच लाख शिवभक्तांनी या वाघनखांचे दर्शन घेतले.

शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे झाल्याचे औचित्य साधून लंडनमधील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली शिवकालीन वाघनखे करारावर 19 जुलै 2024 रोजी साताऱ्यात आणली होती. तेव्हापासून 31 जानेवारी 2025 अखेर सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ती प्रदर्शित केली होती. या वाघनखांविषयी असलेल्या प्रचंड उत्सुकतेतून सात महिन्यांच्या काळात जवळपास पाच लाख शिवप्रेमींनी या वाघनखांचे दर्शन घेतले. नियोजित वेळापत्रकानुसार साताऱ्यानंतर आता नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत, त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 3 मेपर्यंत कोल्हापूर येथील संग्रहालयात व त्यानंतर मुंबई येथे ही वाघनखे शिवभक्तांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.