दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्क मैदानावरील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी मातीचा वरचा थर काढण्यात येणार आहे. यामुळे या थराखालील रेतीमिश्रित मातीचा थर वर येणार असल्याने धूळ उडण्याचे प्रमाण कमी होणार आहे. शिवाय धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी क्रिकेट पिचच्या केअरटेकरनाही सभोवतालच्या भागात पाइपने पाणी मारण्याचे निर्देशही देण्यात आले असून कार्यवाही सुरू आहे.
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान खेळांसह दिग्गज नेत्यांच्या ऐतिहासिक सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दररोज सुमारे दहा हजारांवर खेळाडू येत असतात. शिवाय या ठिकाणी सकाळपासूनच दिवसभर हजारो नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. हे मैदान 28 एकर आणि 1.2 किमीचा परीघ अशा विस्तीर्ण परिसरात पसरलेले असल्याने हवेसोबत धुळीचे भलेमोठे लोळ पसरतात. त्यामुळे प्रदूषण वाढते. याचा त्रास परिसरातील रहिवाशांनाही होत असल्याने पालिकेकडून मैदान धूळमुक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळी मैदानावर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. मात्र सकाळी 10 नंतर उन्हाचा जोर वाढल्यानंतर पुन्हा धूळ उडण्यास सुरुवात होते. त्यामुळे मैदान कायमस्वरूपी धूळमुक्त करण्यासाठी पालिकेकडून व्यापक प्रमाणात उपाययोजना करण्यात येणार आहेत.
असे होणार काम
या मैदानात सुमारे 70 टक्के मातीचा भाग तर सुमारे 30 टक्के हिरवळ आहे. मैदानाच्या देखभालीसाठी या मैदानात काही वर्षांपूर्वी लाल माती टाकण्यात आली. मात्र वाऱ्यामुळे ही धूळ नियमितपणे उडत असल्याने आता या मातीचा 9 इंचाचा थर जेसीबी आणि इतर सामग्रीच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. यानंतर मैदानाचे समतलीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मैदानाच्या स्वरूपाला कोणताही धक्का लागणार नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या जी/उत्तर दादर विभागाकडून पालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
‘आयआयटी’च्या तंत्रज्ञानानेही होणार काम
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील धुळीची समस्या कमी करण्यासाठी ‘आयआयटी’ मुंबईच्या तंत्रज्ञानाचा वापरही केला जाणार आहे. यासाठी नेमलेल्या सल्लागार समितीच्या निर्देशानुसार ‘आयआयटी’ने अहवालही सादर केला आहे. यामध्ये ‘आयआयटी’च्या तंज्ञांनी अनेक सूचना केल्या असून उपायही सुचवले आहेत. यानुसार लवकरच कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अहवालाचा अभ्यास करण्यात येत असून प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.