शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल’ उद्या, 11 जानेवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे सुरू होणार आहे. कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा यांची पर्वणी या चार दिवसीय महोत्सवात असणार आहे.
‘वेध’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संपन्न होणाऱया या फेस्टिव्हलचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यंदाचे खास आकर्षण म्हणजे निष्ठावान वीर मराठा योद्धय़ांची चित्रमय यशोगाथा सांगणारे ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे प्रदर्शन तसेच दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्रs इतिहासप्रेमींना बघण्याची संधी मिळेल. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मृतिस्थळाच्या मागील जागेत हे प्रदर्शन पाहता येईल.
‘निर्मिती’ व्यासपीठाच्या माध्यमातून वनिता समाज हॉल येथे 11 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता बिझनेस कनेक्टअंतर्गत उद्योजक चेतन रायकर आणि कौस्तुभ रायकर यांची मुलाखत घेण्यात येईल. 12 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम सादर होईल. 13 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता ‘भरतनाटय़म’तर 14 जानेवारीला दुपारी 2 वाजता ‘उभ्या उभ्या’ हा सेलिब्रेटींचा स्टॅण्डअप कॉमेडी शो होईल, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक आणि शिवसेना सचिव ऍड. साईनाथ दुर्गे यांनी केले आहे.
किड्स कार्निव्हलची धूम
पालक आणि चिमुकल्यांसाठी ‘किड्स कार्निव्हल’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. वनिता समाज हॉल येथे आयोजित चित्रकारांच्या कलाक्षितिज आर्ट गॅलरीत कलात्मक वस्तूंची स्टॉल, लहानग्यांसाठी कला शिबीर यासोबत निसर्गचित्रण, छायाचित्रण आणि चित्रकला स्पर्धेसह शिवाजी महाराज पार्क परिसरात तयार केलेले सेल्फी पॉइंटस, आर्ट इन्स्टोलेशनने हा परिसर गजबजणार आहे. ‘पार्कातील कट्टा’ म्हणजे शिवाजी पार्क रियुनियनच्या निमित्ताने अनेक मित्र समूह शिवाजी पार्क कट्टय़ावर गप्पागोष्टी करण्यास एकत्रित येतील.
खवय्यांसाठी पर्वणी
पालिका क्रीडा भवन मैदानात ‘मुंबई फूड फेस्ट’च्या निमित्ताने अस्सल खाद्य महोत्सवाची मेजवानी मिळणार आहे. याशिवाय 11 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धा, 12 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता ‘दादूस आला रे’, 13 जानेवारीला सायंकाळी 4 पासून ‘दादर गॉट टॅलेंट’ आणि सायंकाळी 6 वाजता ‘कोकण कलेक्टिव्ह बॅण्ड’चा परफॉर्मन्स होईल. 14 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता ‘थ्री मॉन्क्स बॅण्ड’चे सादरीकरण होईल.