शिवशाही पुनर्वसन कार्यालयात छत्रपती शिवरायांचे तैलचित्र लावा; शिवसेना, भीम आर्मीची मागणी

सरकारच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘शिवशाही पुनर्वसन योजने’च्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महारांचे तैलचित्र लावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना आणि भीम आर्मीने प्रशासनाला दिला आहे. याबाबत शिवसेनेचे संघटक विलास रुपवते, भीम आर्मीचे अशोक कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज शिवशाही पुनर्वसन प्रकल्प प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक अजिज शेख यांना निवेदन दिले.

गोरगरीब, वंचितांना हक्काचे घर मिळावे यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असणाऱ्या या संस्थेत झोपडपट्टी, फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन केले जात आहे. याचा मोठा फायदा गोरगरीब आणि वंचितांना होत आहे. मात्र सरकारच्या माध्यमातून वांद्रे पूर्व येथे सुरू करण्यात आलेल्या ‘शिवशाही पुनर्वसन प्रकल्प प्राधिकरणा’च्या कार्यालयात छत्रपतींची प्रतिमा लावलेली नाही. त्यामुळे शिवरायांची प्रतिमा तातडीने या ठिकाणी लावावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याची दखल घेत संचालक शेख यांनी या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.