उत्तर प्रदेशातील संभल येथील शिवमंदिर तब्बल 46 वर्षांनंतर उघडण्यात आले आहे. हे मंदिर एका बंद घरात सापडले. 1978 मध्ये येथे झालेल्या जातीय दंगलीनंतर हे घर बंद होते. दंगलीनंतर घराची विक्री झाली तेव्हापासून घर बंद असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र पेन्सिया आणि पोलिसांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने शाही जामा मशीद परिसरात अतिक्रमण आणि वीजचोरीविरोधात मोहीम राबवली असता शिवमंदिर उघडण्यात आले. मग मंदिराची स्वच्छता करण्यात आली. तसेच परिसरातील रस्ते व नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. वीजचोरीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, विद्युत पथकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.