प्रशांत मयेकर गेली 35 वर्षे पाण्यावर रांगोळी काढतात. यंदाच्या दिवाळीत त्यांनी खास कलाकृती साकारली आहे. प्रशांत मयेकर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ही रांगोळी पाण्यावर साकारली आहे. अतिशय अवघड अशी रांगोळी असून त्यासाठी त्यांनी पाच दिवस अतोनात मेहनत घेतली.
गोरेगाव येथे राहणारे प्रशांत मयेकर पाण्यावर तरंगती चित्र रांगोळी साकारतात. अशा हजारो कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत. या वेळी त्यांनी पाण्यावर शिवराज्याभिषेक सोहळा रांगोळीच्या माध्यमातून साकारला आहे. ही त्यांची 1051 वी कलाकृती आहे. या रांगोळीचा आकार तीन फूट बाय सहा फूट आहे.
जगामध्ये पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळ्याची पाण्यावरील तरंगती चित्र रांगोळी काढण्यात आल्याचे मयेकर यांनी सांगितले. ही रांगोळी म्हणजे माझे कित्येक वर्षांचे स्वप्न आहे. कोणतीही भौमितीक साधने न वापरता मी रांगोळी काढली. अत्यंत काळजीपूर्वक काम करावे लागले असे मयेकर यांनी सांगितले.
– घरात साकारलेले शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तरंगते रांगोळी चित्र रसिकांसाठी एक महिना ठेवण्याचा मयेकर यांचा प्रयत्न आहे. ज्या कलाप्रेमींना ही रांगोळी पाहायची आहे, त्यांनी 9820762267 या क्रमांकावर संपर्क साधावा. पत्ता- 801, एसबीआय, श्री सोसायटी, सोनावाला रोड, जयप्रकाश नगर, रेल्वे स्टेशनसमोर, गोरेगाव पूर्व.