माणगावच्या आपला दवाखान्यात अखेर डॉक्टर रुजू, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा

>> सामना प्रभाव

माणगावमधील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात अखेर एमबीबीएस डॉक्टर रुजू झाले आहेत. त्यामुळे परिसरातील गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याने याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देण्यात आली होती. दैनिक ‘सामना’ नेही याविरोधात आवाज उठवला होता. त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेऊन या दवाखान्यात तातडीने डॉक्टरांची नियुक्ती केली.

माणगावमधील आपला दवाखान्यात डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. या दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत होते. हा गलथान कारभार उघडकीस आल्यानंतर युवासेनेचे जिल्हा चिटणीस डॉ. अमेय उभारे, तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, शहरप्रमुख अजिंक्येश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली पुरी यांच्या कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी शाखाप्रमुख ऋषिकेश मोरे, रविश गोटेकर, हार्दिक काते, अथर्व हाटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यानंतर आरोग्य विभागाची एकच पळापळ उडाली. या दवाखान्यासाठी एमबीबीएस डॉक्टर नितीन सोनूने यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. सोनूने यांचे युवासेनेचे जिल्हा चिटणीस अमेय उभारे यांनी स्वागत केले आहे.